होय! 26/11 हल्ल्याचा आम्ही बदला घेतला नाही, काँग्रेस नेत्याची जाहीर कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही पाकिस्तानात विमाने घुसवू शकलो असतो आणि त्यांना धडा शिकवू शकलो असतो मात्र आम्ही असे केले नाही असे काँग्रेसचे नेते सॅम पित्रोडा यांनी म्हटले आहे. पित्रोडा यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याबाबत त्यांची भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले ‘दहशतवादी हल्ले सतत होत असतात, मुंबईवरही हल्ला झाला होता आम्हीपण आत्ता जशी कारवाई केली तसे वागू शकलो असतो, पाकिस्तानात विमाने घुसवू शकलो असतो मात्र आम्ही तसे केले नाही, कारण जगाशी असं वागणं योग्य नाही’

पित्रोडा एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी म्हटले की ’26/11 ला 8 जण आले आणि त्यांनी हल्ला केला. यासाठी तुम्ही संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार धरू शकत नाही.काही लोकांसाठी पाकिस्तानमधल्या सगळ्या लोकांना जबाबदार ठरवणं चूक आहे. असा विचार करणं चूक आहे.’

पित्रोडा यांच्या या विधानाचा भाजपकडून समाचार घेतला जाण्यापूर्वी ट्विटरवरून सामान्य नागरिकांनी आक्षेप नोंदवत त्यांच्यावर टीका केली आहे.

भाजपच्या नेत्यांनीही पित्रोडा यांच्यावर टीका करायला सुरूवात केली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटरद्वारे या विधानावर त्यांची भूमिका मांडली आहे. पात्रा यांनी म्हटलंय की काँग्रेस पक्षाने पाकिस्तान आणि दहशतवाद हे वेगवेगळे आहेत हे सांगण्याचा चालवलेला प्रयत्न आश्चर्यकारक आहे.