
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या ताफ्यातल्या चार गाड्या एकमेकांवर आदळल्याने अपघात झाला आहे. या अफघातात काही जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अखिलेश यादव हे हरपालपूर येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. त्यावेळी खेमीपूर गावाजवळ त्यांच्या ताफ्यातील एका गाडीने अचानक ब्रेक मारला त्यानंतर त्या मागच्या तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या तीन गाड्यांमधील पोलीस व अखिलेश यादव यांचे काही सुरक्षा रक्षक जखमी झाले. या घटनेचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अखिलेश यादव गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. गुरुवारी अखिलेश यादव हे मुरादाबाद येथे जाणार होते. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने त्यांच्या विमानाला लँड करायला परवानगीच दिली नसल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केला होता.


























































