
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा वाढत चालला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ऋतुजा लटके यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता संभाजी ब्रिगेडच्यावतीने अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुरुवारी एक पत्रक जरी करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. संभाजी ब्रिगेडने पत्रकात म्हटले आहे की, सप्रेम जय जिजाऊ ! शिवसेना व संभाजी ब्रिगेड ही नव्याने झालेली युती आहे. या युतीचा धर्म जोपासत संभाजी ब्रिगेडच्यावतीने अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेना पक्षाने दिलेले उमेदवार श्रीमती ऋतुजा रमेश लटके यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. तसेच संभाजी ब्रिगेड या निवडणुकीत आपल्या सोबत सक्रीय सहभाग नोंदवून पुर्ण ताकदीने उमेदवार निवडून आणण्यास कटिबध्द राहील.
याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांच्या सोबत पूर्ण ताकदीने असल्याचे जाहीर केले आहे. तर लाल बावटय़ाचीही शिवसेनेच्या भगव्याला साथ मिळाली आहे. त्यामुळे आता अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे.



























































