संभाजीनगरजवळील पंढरपूर येथे गोळीबार, झटापटीत दोन जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दरोडा किंवा जबरी चोरी व लुटमारीच्या उद्देशाने स्कार्पिओ या चार चाकी वाहनातून आलेल्या पाच ते सहा जणांनी संभाजीनगर जवळील पंढरपूर येथील कपड्याचे दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा दरोड्याचा प्रयत्न फसला. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तसेच यावेळी झालेल्या झटापटीत दोन जण जखमी झाले आहे. दोघांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी 14 डिसेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पंढरपूर येथे ही घटना घडली.

मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्हा येथील 25 ते 30 व्यावसायिक उबदार कपडे विकण्यासाठी संभाजीनगर जवळील पंढरपूर येथे आलेले आहेत. संभाजीनगर पुणे महामार्गाच्या दुतर्फा त्यांची दुकाने आहेत. मंगळवारी नेहमीप्रमाणे दिवसभराची ग्राहकी झाल्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास सर्वांनी झोपडी वजा असलेली दुकाने बंद केली होती. मात्र रात्री 11:30 च्या सुमारास एका स्कार्पिओमधून पाच ते सहा दरोडेखोर आले त्यांनी प्रथम या कपड्यांच्या दुकानावर जाऊन कपडे चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या आवाजाने या दुकानातील आसिफ हा जागी झाला त्यांनी कोण आहे असे विचारतात त्याला दुधारी चाकू काढून धमकावण्यात आले. त्याने आरडाओरडा करताच शेजारील दुकानदार त्याच्या दिशेने धावत आले. त्यावेळी दरोडेखोरांनी दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला त्यामुळे सर्वच दुकानदार खडबडून जागे झाले. त्यांनी स्कार्पिओच्या दिशेने गोळीबार करणाऱ्यांवर दगडफेक केली. त्यावेळी दरोडेखोर पळून जायचा प्रयत्न करत होते. मात्र त्या गडबडीत स्कार्पिओ गाडी सुरू झाली नाही म्हणून दरोडेखोरांनी स्कार्पिओ घटनास्थळी सोडून ते पसार झाले. या झटापटीत राजू गोवर्धन बंजारा (32) व मुकेश उर्फ भिमा नथुलाल बंजारा (35) असे दोन जण जखमी झाले. राजू बंजारा यास उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहेत तर मुकेश हा किरकोळ जखमी आहे. या प्रकरणातील वाळुज एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत एका आरोपीस ताब्यात घेतले दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दीपक गिरे सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आरोपीला रात्री अटक करण्यात आली.