सरपंचपदासाठी तब्बल चौदा लाखांची बोली, संभाजीनगरच्या शेलूद गावातील धक्कादायक प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गावचा कारभारी थेट जनतेतून निवडण्यासाठी मिंधे सरकारने आणलेल्या कायद्याला संभाजीनगर जिह्यातील शेलूद ग्रामपंचायतीने हरताळ फासला आहे. या गावात सरपंचपदाच्या लिलावासाठी तब्बल साडेचौदा लाख रुपयांची बोली लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने मिंधे सरकारच्या पारदर्शक कारभाराचा बुरखा टरटरा फाटला आहे.

लाडसावंगी पंचायत समिती गणातील शेलूद गावात सरपंच, उपसरपंच व सदस्य पदांसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान तर 20 डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला. गावात बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. यात थेट जनतेतून सरपंच व नऊ सदस्य बिनविरोध निवडणूक आले होते. परंतु या बिनविरोध निवडणुकीमागे सरपंच, उपसरपंच व सदस्य पदाचा लिलाव करून गावाने निवडणूक बिनविरोध झाल्याचा देखावा केल्याचा आरोप उपसरपंच पदाचे उमेदवार राजू गणपत म्हस्के यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी, तहसील विभाग कार्यालय, पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

z सरपंचपदासाठी चौदा लाख पन्नास हजारांची बोली लावण्यात आली होती. यात नऊ सदस्य व थेट जनतेतून सरपंच असे दहा सदस्यांत एकूण 28 लाख 56 हजार रुपये जमा करून एका खासगी बँकेत पैसे जमा करण्यात आले. परंतु 13 जानेवारी रोजी उपसरपंच पद ठरल्याप्रमाणे राजू म्हस्के यांना न दिल्याने 14 जानेवारी रोजी राजू म्हस्के, दर्शना म्हस्के, मधुकर चौधरी यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला. 27 जानेवारी रोजी तक्रार देऊन राजू म्हस्के यांनी चौकशीची मागणी केली आहे.