शिक्रापूर मध्ये तलाठ्याला ट्रकमधून ओढून वाळूचा ट्रक चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक छायाचित्र

सामना प्रतिनिधी, कवठे येमाई

शिक्रापूर ता. शिरूर येथे तलाठ्यांनी वाळूचा ट्रक कारवाई करून ताब्यात घेत शासकीय गोदाम तळेगाव ढमढेरे येथे घेऊन जात असताना ट्रकच्या चालक, मालक व त्यांच्या दोन साथीदारांनी तलाठ्यास ट्रकमधून ओढून सरकारी कामात अडथळा आणत ट्रक चोरी केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ट्रकचालक, ट्रकमालकासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूरचे तहसीलदार रणजीत भोसले यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दिलेल्या कारवाईच्या आदेशानुसार आंधळगाव येथे कार्यरत असलेले तलाठी दिपक गांगर्डे, न्हावरेचे तलाठी एम. बि. बिराजदार, पिंपळे जगतापचे तलाठी जे. डी. धूरधर, आलेगाव पागाचे तलाठी जे. एस. इंगळे हे शिक्रापूर चौकात थांबलेले असताना त्यांना वाळूने भरलेला एम एच १४ डी. एम ३४११ हा ट्रक आलेला दिसला. त्यावेळी कारवाईसाठी थांबलेल्या तलाठ्यांनी ट्रकचालकाला थांबविले आणि त्यामध्ये तलाठी गांगर्डे व इंगळे हे बसले. त्यांनी ट्रकचालकाला त्याचा नाव पत्ता विचारला आणि त्याला सदर ट्रक शासकीय गोदाम तळेगाव ढमढेरे येथे घेण्यास सांगितला. सदर ट्रक घेऊन ट्रकचालक व तलाठी हे तळेगाव ढमढेरे येथे जात असताना पाठीमागून एका स्कॉर्पिओ गाडीतून ट्रकमालक किरण झंजाड व दोन अनोळखी इसम आले. त्यावेळी ट्रकचालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला. त्यावेळी तलाठी गांगुर्डे यांना खाली उतरण्यास सांगितले. तेव्हा तलाठी इंगळे हे ट्रकमध्ये असताना स्कॉर्पिओमधून आलेल्या इसमांनी इंगळे यांना खाली ओढले. त्यावेळी किरण झंजाड व अनोळखी इसमांची तलाठ्यांसह हुज्जत सुरु असताना ट्रक चालकाने तलाठ्यांनी कारवाई करून ताब्यात घेतलेला एम एच १४ डी. एम ३४११ हा ट्रक जबरदस्तीने पळवून नेला. याबाबत आंधळगाव येथील तलाठी दीपक गांगर्डे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ट्रकचालक संदीप पवार, , ट्रकमालक किरण झंजाड यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा तसेच चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.