बाळगुटी!

552

>> डॉ. विजया वाड

साने गुरुजी, कुसुमाग्रज,  विंदांच्या बालकविता एका जागी एकवटल्या आहेत.

मराठी साहित्यातील निवडक बालकवितांचे संकलन या पुस्तकात दीपाताईंनी केले आहे. अनेक बालसाहित्यिकांच्या साहित्यकृतींचा अनुभव एकत्रितरीत्या घेता येणे ही एक आनंददायी घटना आहे. खरं सांगायचं तर मोठे झाल्यावरही बालकवितांची ओढ मनात कायमच असते. मला तर ‘या बाई या… बघा बघा कशी माझी बसली बया’ तसंच ‘पलीकडे ओढय़ावर… माझे गाव ते सुंदर’, ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे…’ या नि अशा कविता बालकांसोबत म्हणताना अत्यंत आनंद होतो. याचे कारण काय बरे? आपल्या मनात दडलेले एक खोडकर, खटय़ाळ, लहानगे मूल! या पुस्तकाचे वाचन म्हणजे बालक होण्यातले सुख! परत नव्याने बालपण उजळणे, अनुभवणे. दीपा क्षीरसागर यांनी प्राचीन बालकवितांपासून आधुनिक मराठी बालकवितेपर्यंतचा विचार केलाय ही गोष्ट स्तुत्य आहे.

आजी-आजोबांची नातवंडांशी गट्टी जमते ती बाळगाणी, गोष्टी यातूनच! बालकवितेचे साधारणपणे शिशुगट, बालगट आणि कुमारगट असे तीन भाग पडतात. शिशुगटात लहानग्यांना बडबडगीते फार आवडतात. ज्यात ताल, सूर, लय यांना खूप महत्त्व असते आणि शिशुगीते आईच बाळासाठी गाताना दिसते. आठ वर्षांखालची मुलेही आवडीने ऐकतात. बालगीते आठ ते बारा वयाची मुले गातात तर कुमारगीते 13 ते 15 वयोगटात मुले आवडीने गातात. ‘चला उभारा शुभ्र शिडेही, गर्वाने वरती! कथा या खुळय़ा सागराला… अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा!

किनारा तुला पामराला!’
कविवर्य कुसुमाग्रजांचे हे गीत म्हणताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहत आम्हा किशोरींच्या! अन् त्यातीलच ‘सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात… बद्ध करांनी करिती तुजला अखेरचा प्रणिपात! देशिल ना पण तुझ्या कुशीचा वेडय़ांना आधार? आई, वेडय़ांना आधार! गर्जा जयजयकार क्रांतीची गर्जा जयजयकार’ म्हणताना आमचे नि बाईंचेही डोळे वाहू लागत.
‘करी मनोरंजन जो मुलांचे
जडेल नाते प्रभुशी तयांचे’ ही साने गुरुजींची ओळ आठवते ना? बालरंजन करणाऱयाचे थेट देवाशी नाते जुळते ही केवढी सुंदर बाब! म्हणून बालसाहित्यास खूप महत्त्व दिले पाहिजे. काही कौटुंबिक काव्यांची ओळख दीपाताईंनी करून दिलीय हे महत्त्वाचे वाटते. तुम्हाला चालायला शिकविताना आई-आजीने म्हटलेले गाणे कोणते?
‘एक पाय नाचिव रे, गोविंदा!
घागरीच्या छंदा। एक माय नाजिव रे, गोविंदा।’
किंवा चार चिमण्या पोरी जमल्या की
‘आपडी थापडी, गुळाची पापडी! धम्मक लाडू… तेल पाडू… तेलंगीचे एकच पान… धर गं गोपी एकच कान…’ किंवा आवडतं गाणं पोरी पोरींचं!… ‘चांदोबा चांदोबा भागलास का? लिंबोणीच्या झाडामागे लपलास का?’ हे शिकवावं लागतं का हो? ‘ये रे येरे पावसा… तुला देतो पैसा…’ पिढय़ानपिढय़ा या बाळगीतात लपल्यात. ‘लहान माझी बाहुली’ म्हणतच आपण मोठे झालो ना? ‘झुकुझुकु झुकुझुकु आगिनगाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी… पळती झाडे पाहूया… मामाच्या गावाला जाऊ या’ हे गात शिटय़ा वाजवीत रांगेत गाडी न चालवलेलं एक्कही मराठी मूल सापडणार नाही. माफ करा, ‘जॅक ऍण्ड जिल, वेंट अप द हिल’च्या जमान्यात झुकुझुक आगीनगाडी बंद पडलीय याचं अतोनात वाईट वाटतं नि मग दीपा क्षीरसागर या व्यक्तीचं अधिकच कौतुक मनी दाटतं!

या पुस्तकात कोण नाही? मोजकीच पण सुरेख बालगीते लिहिणारे भा. रा. तांबे आहेत. (आठवते? कुठे बुडाला पलिकडील तो सोन्याचा गोळा?), केशवसुतांची ‘पखरण’, लक्ष्मीबाई टिळकांची ‘कावळा’ ही कविता… ज्यात बाळ नि कावळा यांचा संवाद आहे (मज्जाच ना?), ना. वा. टिळक यांची ‘बाहुल्यांचे वैद्यराज’ ही कविता तर अगदी मुलांना आवडण्याजोगी. बाळगाणी निखळ करमणूक करणारी आणि ‘बोधांचे’ डोस न देणारी असावीत, त्यास नाद, लय, तालाचेच अलंकार असावेत हे दीपाताईंचे मत प्रत्येक लेखक – वाचकास पटावे. प्र. के. अत्रे ऊर्फ केशवकुमार यांची ‘आजीचे घडय़ाळ’ ही कविता आजन्म लक्षात राहावी, अशी तर ‘देवा तुझे किती… सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो’ ही नितांत सुंदर कविता आठवणींची पोतडी उघडते. ‘फुलपाखरू छान किती दिसते’ ही ग. ह. पाटील यांची प्रत्येक बालकास नाचवणारी कविता! गदिमांची ‘गोरी गोरी पान, फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण!’ ही कविता पाहून मन तुष्ट होते.

शब्द साधो, सोपे नि त्यातील नाद, लय, गेगता, अनुप्रासाचे अलंकरण या वैशिष्टय़ांनी हव्याहव्याशा वाटणाऱया या बालकविता जणू निसर्ग, जग, झाडे, पाने, फुले, चंद्र, सूर्य, मुले, आजी, आजोबा असे एक भांडारच शब्दांच्या पोतडीतून बाहेर काढतात नि मनास अपूर्व आनंद देतात.
अगदी संत कवींपासून संगीता बर्वेपर्यंत बालकवितांचा शोध घेणे हे सोपे काम नाही. पण हे शिवधनुष्य मोठय़ा धीराने आणि तपश्चर्येने पेलणाऱया दीपाताई खरोखर अभिनंदनास पात्र आहेत. पूर्वीच्या तुलनेत आताची बाळगाणी ‘प्रोगेसिव्ह’ झाली आहेत. बडबडगीते जोरात आणि जोमात आहेत. नवी टेक्नॉलॉजी या कवितांतूनही डोकावत आहे बघा! संगीता बर्वे यांची ही कविता पहा,
‘अहो इतकी म्हणजे इतकी हुशार… झालीय आमची आजी फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम… यूज करते टेक्नॉलॉजी!’
तर डॉ. सुहासिनी इर्लेकर या कवयित्रीच्या कवितेचे शीर्षकच मुळी ‘आजी आणि शेनवॉर्न’ आहे.
देविदास फुलारी, दत्तात्रय कोंडो घाटे (कवी दत्त), ना. गं. लिमये, यांच्या कविताही आनंद देतात. माधव जुलियन, बालकवी, वा. गो. मायदेव, सोनगुरुजी या प्रस्थापित कविवर्यांसोबत 225 कवी? बाप रे बाप! पुंडलिक वझे यांचे बोलके मुखपृष्ठ!

दीपा क्षीरसागर यांनी जो अथक प्रयत्नांचा डोंगर पार केला, जो कवितांचा सागर घुसळला त्यातून कवितारत्ने एकत्रित अशा लावण्यमयी स्वरूपात बाहेर पडली. अगदी नवनीतासारखी. खरोखर प्रत्येक कविताप्रेमींच्या संग्रही असावे असे पुस्तक! सुंदर, सुबक, सुरेख!

चिऊताई चिऊताई दार उघड,
लेखक – दीपा क्षीसागर,
प्रकाशक – मॅजिस्टिक प्रकाशन
पृष्ठे – 251, मूल्य – 300 रुपये
मुखपृष्ठ – पुंडलिक वझे

आपली प्रतिक्रिया द्या