सांगली शहरात महापूर संथ गतीने ओसरतोय; शिवाजी मंडई परिसर, सिद्धार्थनगर, गावभाग अद्यापी पाण्याखालीच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृष्णा, वारणा नदीकाठ आणि निम्मेअधिक सांगली शहर उद्ध्वस्त करून महापूर परतीच्या वाटेवर असला, तरी आजही सांगली शहरातील मारुती रोड, शिवाजी मंडई परिसर, सिद्धार्थनगर आणि गावभाग परिसर पाण्याखाली आहे. कालपासून अवघे आठ ते नऊ फूट पाणी ओसरले आहे. कृष्णा नदीची आजही धोक्याची पातळी कायम आहे. सुदैवाने पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. पाण्यातून रस्ते मोकळे होत असतानाच दुकानदारांनी दुकानांची स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.

अतिवृष्टीमुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठी हाहाकार उडाला. महापुराचा मोठा फटका सांगली शहराला बसला. निम्मेअधिक शहर महापुराच्या पाण्याखाली होते. 2005 आणि 2019च्या महापुरापेक्षा या वेळच्या महापुराने सांगली शहरातील अधिक क्षेत्र बाधित झाले. सुदैवाने या काळात जीवितहानी झाली नाही; पण घरांचे, व्यापारी दुकानांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या शेतीपिकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कालपासून महापुराचे पाणी ओसरू लागले असले, ज्या गतीने पुराचे पाणी वाढते, त्याच गतीने पुराचे पाणी ओसरते; परंतु या वेळचा पूर अत्यंत संथ गतीने ओसरत असल्याचे दिसत आहे. कालपासून आज सायंकाळपर्यंत फक्त आठ फुटांपर्यंत पाणी उतरले आहे. सांगलीची मुख्य बाजारपेठ मारुती रोड अद्यापि पाण्याखाली आहे. स्टेशन रोड, वखार भाग, मेन रोड, कापडपेठ, सराफ बाजार, हरभट रोडने मोकळा श्वास घेतला आहे. शहरातील ज्या बाजारपेठेतील पाणी ओसरू लागले आहे, तेथील दुकानदारांनी दुकाने स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. पाणीपुरवठा सुरू झाला असला, तरी अनेक भागांत पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.