संगमनेरकरांना मिळणार मुबलक पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमनेर शहराची वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन पूरक पाणीपुरवठा प्रकल्प योजनेसाठी 22.79 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी दिली आहे. यामुळे संगमनेरकरांना मुबलक आणि वेळेत पाणीपुरवठा होणार आहे.

नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, नगरपरिषदेने सातत्याने शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवल्या आहेत. शहरातील आधुनिक सुविधा व मुबलक पाण्याची व्यवस्था लक्षात घेऊन शहरात दिवसेंदिवस नागरिकांची लोकवस्ती वाढत आहे. या नागरिकांसाठी पूरक पाणीपुरवठा मंजूर व्हावा, यासाठी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष कुंदन लहामगे, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटारी जलनिस्सारण प्रकल्प सादर केला होता. यातून जलनिस्सारण प्रकल्पासाठी 95.16 कोटी रुपये मंजूर झाले असून, पहिला हप्ता 61 कोटी रुपयांचा निधी पालिकेला मिळाला आहे.

तसेच, राज्य शासनाने पूरक पाणीपुरवठा पुरवठा प्रकल्प योजनेस 22.79 कोटी रुपयांचा निधी दिला असून, या अंतर्गत शहरात पाणीपुरवठा योजना लोकसंख्येनुसार उर्वरित भागात निळवंडे धरणाचे पाणी पुरवणे, नवीन जलवाहिनी टाकणे, निळवंडे धरण येथे साठवण तलाव व जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शहरातील पंपिंग स्टेशन स्वयंचलित करणे, ज्ञानमाता हायस्कूल येथील पाणी वितरण व्यवस्थेत अतिरिक्त भार येत असल्यामुळे पाबळे वस्ती येथे नवीन पाण्याची टाकी उभारणे या कामांचा समावेश आहे.

या पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, सहायक कार्यालय निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, पाणीपुरवठा अभियंता स्वाती मोरे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.