‘मॉडेल स्कूल’ मध्ये शाळांची गुणवत्ता वाढायला हवी, पालकमंत्री जयंत पाटील यांची अपेक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात ‘मॉडेल स्कूल’ उपक्रम सुरू केला. दोन टप्प्यांत जवळपास 250 शाळांचा उपक्रमात सहभाग झाला. मात्र, ‘मॉडेल स्कूल’ उपक्रमात केवळ इमारती आणि सोईसुविधा वाढविणे अपेक्षित नसून, त्या शाळांची गुणवत्ता वाढायला हवी, अशी अपेक्षा जलसंपदामंत्री, पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी जयंत पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे यांच्या कामाचे कौतुक केले. जिल्हा परिषदेत आमची सत्ता नसल्याने आम्ही त्यांना अध्यक्ष किंवा सभापती करू शकलो नाही. मात्र, कचरे यांनी सुरू केलेले विकासाचे काम अखंड सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.

वाळवा तालुक्यातील कारंदवाडी येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कृषिभूषण स्व. बाबूराव कचरे व स्व. विलासराव रसाळ स्वागत कमानींचे उद्घाटनही करण्यात आले. याप्रसंगी जयंत पाटील बोलत होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपसभापती नेताजीराव पाटील, तहसीलदार धनश्री भांबुरे, डॉ. आबासाहेब पवार, जि. प. सदस्य संभाजी कचरे, जनार्दन पाटील, सरपंच पद्मजा कबाडे आदी उपस्थित होते. यावेळी म्हाडाचे विकास रसाळ, श्रीराज चेतन आवटी यांचा सत्कार करण्यात आला.

जयंत पाटील म्हणाले, आपल्या गावात आरोग्य उपकेंद्राची मागणी असून, लवकरच त्याची पूर्तता करण्यात येईल, तसेच काम करणाऱया कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आपल्या गावाची परंपरा आहे. त्यानुसार संघटितपणे काम करून आपण विकासकामे गावात खेचून आणल्याचे मोठे समाधान आहे, असे त्यांनी सांगितले.

संभाजी कचरे म्हणाले, कारंदवाडी, कृष्णानगर, हाळ भागात 1 कोटी 75 लाखांच्या 18-19 कामांचे उद्घाटन-भूमिपूजन केले आहे. 21 लाख खर्चून ग्रामपंचायतीचे नूतनीकरण केले, व्यापारी संकुल बांधले आहे. गावात दोन स्वागत कमानी उभारल्या आहेत. गेल्या 20 वर्षांपासून पंचायत समिती व जिल्हा परिषदेत काम करीत असून, गावासह मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावली आहेत. भविष्यात एकसंधपणे मंत्री जयंत पाटील यांच्या पाठीशी उभे राहून, असे ते म्हणाले.