शिवसैनिकांच्या संरक्षणात सांगली-मिरज एसटी वाहतूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसैनिकांच्या संरक्षणाखाली सांगलीतून काही मार्गांवरील एस.टी. प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. सांगलीतून मिरजेसाठी सहा गाडय़ा सोडण्यात आल्या. ईश्वरपूर बसस्थानकात शिवसेना आणि रयत क्रांती संघटनांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी या प्रकरणावर तोडगा काढला. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात, गुलाब पुष्प देऊन एसटी कर्मचाऱयांचे शिवसैनिकांनी स्वागत केले.

एसटी कर्मचाऱयांचा संप सुरू असताना सेवेवर येण्याचे धाडस दाखवणाऱया कर्मचाऱयांना पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिक मैदानात उतरले. शिवसैनिकांनी संरक्षण देत काही एसटी बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी पाठविल्या. सांगली, मिरज, ईश्वरपूर आगारातून काही गाडय़ा सोडण्यात आल्या. शिवसैनिकांनी या बसेसना खासगी गाडीतून संरक्षण दिले.

ईश्वरपूर बसस्थानकात शिवसैनिक आणि रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती निवळली. जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी बसेस सोडल्या. शहरप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी स्वतःच्या गाडीतून कर्मचाऱयांना संरक्षण दिले. शहरप्रमुख विशालसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली मिरज आगारातून गाडय़ा कर्नाटककडे रवाना झाल्या. शिवसेनेचे जिल्हा संघटक बजरंग पाटील, युवासेनेचे सचिन कांबळे यांचे सहकार्य लाभले.

कवठेमहांकाळ – तासगाव आगाराची एसटी सेवा सुरू करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख प्रदीप माने-पाटील, संदीप गिड्डे-पाटील, शहरप्रमुख विशाल शिंदे, युवासेनेचे नितीन राजमाने, जयवंत माळी, अनिल दौंड, सुशांत यादव, मनीषा पाटोळे, शोभा पिसाळ यांनी यासाठी पुढाकार घेतला.