
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
गेली अनेक वर्षे संगमेश्वर देवरुख हा राज्य मार्ग एक चर्चेचा विषय बनला असून या मार्गाच्या डागडूजीसाठी ठोस उपाययोजना हाती घेतली जात नसल्याने वाहनचालकांना दरवर्षी प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. केवळ १६ किमी लांबीचा हा राज्यमार्ग देखील बांधकाम विभागाला सुव्यवस्थित ठेवता येत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान पाऊस सुरु झाल्यानंतर लगेचच जागोजागी खड्डे पडल्यानंतर आता लोवले येथील एक मोरी मध्यभागी खचली असून यामुळे यामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प होण्याची भिती निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाने तातडीने यामार्गाची दुरुस्ती न केल्यास शिवसेना येत्या आठवड्यात रास्ता रोको आंदोलन करेल असा इशारा शिवसेना संगमेश्वर शहरप्रमुख संजय कदम यांनी दिला आहे.
संगमेश्वर देवरुख हा राज्यमार्ग पुढे कोल्हापूरकडे जातो. यामार्गावर सतत वाहनांची मोठी वर्दळ सुरु असते. यावर्षी डिंगणी – करजुवे भागात वाळू व्यवसाय जोरात सुरु असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील अनेक डंपर आणि ट्रकची वाहतूक कमालीची वाढली होती. गेली दहा वर्षे हा मार्ग दुरावस्थे मुळे चर्चेत आहे. मात्र यासाठी बांधकाम विभागाकडून ठोस उपाययोजना हाती घेतल्या जात नसल्याने दरवर्षी रस्त्याला खड्डे पडणे, मोऱ्या खचणे, गटारे नसल्याने पावसाचे पाणी ठिकठिकाणी रस्त्यावर तुंबून राहणे यासारखे प्रकार घडत आहेत. लोवले येथील नवनिर्माण महाविद्यालयाजवळ गटार बुजवण्यात आल्याने येथील सर्व पाणी गेली तीन वर्षे रस्त्यावरुन वाहत आहे. परिणामी येथून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर वाहने हे पाणी उडवत आहेत.
लोवले ग्रामपंचायती जवळ रस्त्याला मारण्यात आलेला चर गेले चार महिने वाहनचालकांना अत्यंत तापदायक ठरत असून हा चर डांबराने बुजविणे आवश्यक असतांना त्यात केवळ जांभा दगड टाकला जात असल्याने त्याचा कोणताही उपयोग होत नसून अवजड वाहनांचे या चरामुळे मोठे नुकसान होत आहे. गेले चार महिने वाहने या चरात आपटत असल्याने या चराची तातडीने दुरुस्ती करुन वाहनचालकांची त्रासातून सुटला करावी अशी मागणी करण्यात आली आहे. लोवले बसस्टॉपच्या जवळच ओढ्याच्या बाजूला असलेली रस्त्याची जवळपास पन्नास फूट लांबीची संरक्षक भिंत पहिल्याच पावसात कोसळली होती. बांधकाम विभागाने याची तात्पुरती डागडुजी केली असली तरी, संरक्षक भिंतीचे सर्व दगड ठिसूळ झाले असल्याने येथील पन्नास फुटांचा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. याठिकाणी सिमेंट काँक्रीटची मजबूत संरक्षक भिंत उभारण्याची गरज आहे.
मयुरबाग बस थांबा आणि लोवले याच्या बरोबर मध्यभागी दोरकडे यांच्या घराजवळ असणारी मोरी मध्यभागी खचली असून येथे मोठे गोल विवर तयार झाले आहे. पावसाचे पाणी या विवरात साचल्याने ते दिसत नाही परिणामी दुचाकी चालकांना अपघात घडण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. अशा स्थितीत या विवराची तात्पूरती डागडूजी न केल्यास मोरी पूर्णपणे खचून या मार्गावरील वाहतूक बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. येथील ग्रामस्थांनी या धोकादायक मोरी बाबत बांधकाम विभागाला कल्पना दिली असून तातडीने पाहणी करण्याची मागणी केली आहे.
कोसुंब घाटीतही दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील खड्डे पडले आहेत. कोसुंब बस थांब्या जवळ गटारे नसल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येण्याचा प्रकार घडत आहे. संगमेश्वर ते देवरुख या मार्गावरील दुरवस्थेबाबत लोकप्रतिनिधींचे देखील दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनचालक तसेच पादचाऱ्यांनी केला आहे. संगमेश्वर ते साखरपा या मार्गाच्या रुंदीकरणासह डागडूजी साठी ३२ कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र निविदा प्रक्रीया होवून देखील काम सुरु न झाल्याने यावर्षी या मार्गाची अधिक वाताहत झाली आहे. येत्या आठ दिवसांत बांधकाम विभागाने या मार्गाची डागडूजी करुन किमान तात्पूरती उपाययोजना न केल्यास शिवसेना वाहनचालक आणि ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेचे संगमेश्वर शहरप्रमूख संजय कदम यांनी दिला आहे.































































