
संगमेश्वर तालुक्यातील आंगवली पंचक्रोशीतील गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास आणि शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा तसेच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. देवरूख, साखरपा व इतर ठिकाणीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे आंब्याची गळ सुरु झाली असून बागायतदारांना यावर्षी देखील नुकसानाचा सामना करावा लागेल अशी चिन्हे आहेत .
गेले काही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके बसत होते. त्यामुळे उन्हाच्या काहिलीने नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. दुपारी 12 ते 4 पर्यंत प्रचंड ऊन असल्याने नागरिकांच्या शरीराची लाहीलाही होत होती. त्यामुळे उकाड्यापासून सुटका होण्यासाठी नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाल्याने कोणत्याही क्षणी पाऊस बरसेल, अशी शक्यता होती. अखेर सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान, तालुक्यातील आंगवली पंचक्रोशीत पावसाने जोरदार आगमन केले. तसेच आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला .
आंगवली पंचक्रोशीतील आंगवली बोंड्ये, मारळ, निवधे, बामणोली, कासारकोळवण, निवेखुर्द, हातीव, मुरादपूर, हरपुडे, बेलारी, कुंडी , देवरुख , सोनवडे , लोवले , संगमेश्वर धामणी आदी गावांमध्ये पाऊस चांगलाच बरसला. मात्र, अचानक बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच उडाली तारांबळ उडाली.
आंब्यावर संकट
गेले आठवडाभर असलेले ढगाळ वातावरण आणि वाढलेला उष्मा यामुळे मध्यम आकाराच्या आंब्याची मोठ्या प्रमाणावर गळ सुरु झाली होती . अशा स्थितीत गेले दोन दिवस अवकाळी पाऊस बरसल्याने आंबा पिकावर याचा गंभीर परिणाम होणार असून यावर्षी देखील आंबा बागायतदारांना मोठ्या नुकसानाला तोंड द्यावे लागणार अशी चिन्हे असल्याचे संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे येथील आंबा बागायतदार मकरंद मुळ्ये यांनी सामना जवळ बोलतांना सांगितले .




























































