सांगोल्यात चोरीचा 26 लाखांचा ऐवज जप्त; सातजणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगोला पोलिसांनी चोरीस गेलेले तीन अशोक लेलॅण्ड टेम्पो, पाच दुचाकी, केबल, वेल्डिंग मशीन, पाणबुडी मोटार इत्यादी 25 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. याप्रकरणी सातजणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सांगोला शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात विविध प्रकारच्या चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी व उघड करण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिसांना निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पथके तयार केली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गणेश भीमराव शिंदे, सचिन बाळासाहेब दिघे, स्वप्नील बापू येवळे, बिरुदेव ऊर्फ ब्रिया दादासा येवळे, खंडू नामदेव चव्हाण, महेश सुरेश वाघमारे, अतुल श्रीकांत चंदनशिवे या सातजणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विविध गुह्यांच्या अनुषंगाने चौकशी केली. चौकशीतून पोलिसांना तीन अशोक लेलॅण्ड कंपनीचे टेम्पो, पाच दुचाकी, केबल, वायर, 3.5 टन स्टील, वेल्डिंग मशीन, ग्राइंडर कटर, पाणबुडी मोटार इत्यादी
25 लाख 96 हजार रुपये किमतीचे साहित्य मिळाले आहे. सांगोला, आटपाडी व तासगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध 10 गुह्यांची उकल झाल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले, कल्याण ढवणे, अस्लम काझी, सचिन वाघ, अनिल निंबाळकर, अमर पाटील, पैगंबर मुलाणी, गणेश झाडबुके, अन्वर अत्तार यांनी केली आहे.