
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) गेल्या महिन्यामध्ये क्लिन बोल्ड झाला. अँकरिंग करणाऱ्या संजना गणेशन (Sanjana Ganesan) हिच्यासोबत त्याचा विवाह थाटामाटात पार पडला. यानंतर संजनाने हनीमूनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर बुमराहने देखील भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
संजना गणेशन हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हनीमूनचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये संजना पाण्यामध्ये दिसत असून मागे मावळतीला जाणारा सूर्य दिसत आहे. या फोटोसोबत संजना हिने ‘आयुष्यभराच्या आठवणी आणि बरंच काही…’ असे कॅप्शनही दिले आहे. या फोटोवर बुमराहने देखील मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. फोटो काढणारा व्यक्ती खरोखरच चांगला आहे, अशी प्रतिक्रिया बुमराहने दिली आहे.
दरम्यान, जसप्रीत बुमराह याने लग्नाच्या निमित्ताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली होती. आता तो आयपीएलसाठी तयार झाला असून मुंबई इंडियन्सला आणखी एक विजेतेपद पटकावून देण्यासाठी सज्ज आहे. मुंबईला सलामीचा सामना खेळायचा असून रोहित शर्माच्या संघापुढे विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे आव्हान आहे. चेन्नईमध्ये हा सामना रंगणार आहे.
कोण आहे संजना गणेशन?
संजना गणेशन हिने आयपीएल आणि 2019 च्या एक दिवसीय वर्ल्ड कपमध्ये अँकरिंग केले आहे. तसेच ती कोलकाता नाईट रायर्डस या आयपीएलच्या फ्रेंचायजीसाठीही अँकरिंग करते.
रियालिटी शोमध्येही केले काम
संजनाने एमटीव्हीचा रियलिटी शो स्पिल्ट्स व्हिलामधून टीव्हीवर पदार्पण केले. 2013 साली तिने फेमिना गॉर्जियस हा पुरस्कार जिंकला होता. पुण्याच्या सिम्बोयसिस इन्स्टिट्यूटमधून संजनाने इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले, पण यानंतर ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात वळली. 2014 साली ती मिस इंडियाच्या फायनलपर्यंत पोहोचली होती.

























































