
सामना प्रतिनिधी । पुणे
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जीवनचरित्र एवढे मोठे आहे की ते दहा चित्रपटांमध्येही दाखविता येणार नाही. ‘ठाकरे’ चित्रपटात त्यांच्या आयुष्यातील प्रमुख घटना आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सहज बनत नाहीत. त्यामागे मोठा संघर्ष आहे. सामान्य माणूस ते असामान्य नेता हा संघर्षमयी प्रवास म्हणजे ‘ठाकरे’ होय, असे ठाकरे चित्रपटाचे निर्माते, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सांगितले.
वायकॉम 18 मोशन पिक्चर्स, कार्निव्हल मोशन पिक्चर्स आणि संजय राऊत प्रस्तुत ‘ठाकरे’ चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेत्यांशी संवाद साधण्यासाठी द पॅव्हिलियन मॉलमधील ‘पीव्हीआर’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत बोलत होते. चित्रपटातील मुख्य कलाकार नवाजुद्दीन सिद्दिकी, वायकॉम 18 मोशन पिक्चर्सचे निखिल साने, निर्मात्या पूर्वशी राऊत आदी यावेळी उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, आजच्या पिढीने शिवसेनाप्रमुखांचा शेवटचा कालखंड पाहिला आहे. तेव्हाही ते देशातील सर्वोच्च नेते होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सहज बनत नाहीत. त्यासाठीची फार मोठी संघर्षकथा असते. तो संघर्ष कोठून सुरू होतो आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बनण्याची प्रक्रिया काय आहे, एक सामान्य माणूस ते असामान्य नेता तो एक कालखंड या चित्रपटाच्या पहिल्या भागात दाखवावा हे ठरवून चित्रपटाची निर्मिती केली आहे. शिवसेनाप्रमुखांना खूप जवळून पाहण्याचे भाग्य मला लाभले. एक माणूस, एक नेता, एक व्यक्ती, एक कलाकार म्हणून शिवसेनाप्रमुखांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक कंगोरे चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ते आजच्या पिढीलाही कळावे यासाठी हा प्रयत्न आहे.
चित्रपटाबाबत बोलताना पूर्वशी राऊत म्हणाल्या, बाबा आम्हाला नेहमी शिवसेनाप्रमुखांच्या आठवणी सांगत असत. या आठवणी आता पडद्यावर येणार असून सर्व प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आमची पिढी इंटरनेटवर शिवसेनाप्रमुखांची भाषणे, मुलाखती पाहते, मात्र या पलीकडचे शिवसेनाप्रमुख चित्रपटातून कळणार आहेत.
मला बाळासाहेबांच्या व्यक्तिरेखेत पाहून लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया अविस्मरणीय
शिवसेनाप्रमुखांचा रोल करायचा आहे हे कळले तेव्हा माझा माझ्यावर विश्वासच बसला नाही. मात्र ही आपल्या आयुष्यातील मोठी संधी असल्याने खूप आनंदही झाला. शूटिंगसाठी मी जेव्हा शिवसेनाप्रमुखांचा ‘गेटअप’ केला तो पाहून लोकांनी ज्या काही प्रतिक्रिया दिल्या त्या अविस्मरणीय होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब मोठे व्यंगचित्रकार होते, मोठे नेते होते. त्यांची भाषणे, मुलाखती मी इंटरनेटवर पाहिल्या, मात्र त्यांच्या सवयी, त्यांचे विचार हे इंटरनेटवर मिळाले नाहीत. त्यासाठी राऊत साहेबांची खूप मदत झाली, असे अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी सांगितले.
‘ठाकरे’ चित्रपटाची वैशिष्टय़े
- 25 जानेवारीला देशासह जगभरातील 2500 सिनेमागृहांत एकाच वेळी प्रदर्शित होणार.
- हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांतील चित्रपटांचे प्रदर्शन, दोन्ही भाषांतील चित्रपटांची निर्मिती पूर्णपणे वेगळी.
- चित्रपटाच्या दुसऱया भागाचीही निर्मिती होणार.




























































