गटप्रमुख हाच शिवसेनेचा मोठा प्रचारक – खासदार संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjay-raut

सामना प्रतिनिधी, पिंपरी

गटप्रमुख हाच शिवसेनेचा सर्वात मोठा प्रचारक आहे. एक गटप्रमुख शंभर मतदारांचा धनी असतो. त्याने प्रामाणिकपणे काम केले, तर यश हमखास मिळते. त्यामुळे लोकसभा-विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी गटप्रमुखांचे जाळे निर्माण करा, त्यांच्याशी संवाद साधा, असा मूलमंत्र शिवसेना नेते, खासदार, पुणे विभागीय संपर्क नेते संजय राऊत यांनी दिला.

मावळ, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभामतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघनिहाय बैठका संभाजीनगर-थरमॅक्स चौकातील हॉटेल सिट्रसमध्ये पार पडल्या. या बैठकांमध्ये संजय राऊत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. संपर्कप्रमुख बाळा कदम, संपर्कप्रमुख गणेश जाधव (मावळ), गिरीश सावंत (पिंपरी), वैभव थोरात (चिंचवड), जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, मावळ तालुकाप्रमुख राजू खांडभोर, शहरप्रमुख योगेश बाबर, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे, महिला आघाडी संपर्वâ संघटक लतिका पाष्टे, वैशाली सूर्यवंशी, शहरसंघटक सुलभा उबाळे, सल्लागार मधुकर बाबर, विधानसभाप्रमुख प्रमोद कुटे, अनंत कोऱ्हाळे, धनंजय आल्हाट, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अ‍ॅड. सचिन भोसले आदी उपस्थित होते.

खासदार संजय राऊत म्हणाले, उपशाखाप्रमुख, गटप्रमुखाला शिवसेनेने घटनात्मक दर्जा दिला आहे. त्यामुळे त्यांचे पक्षातील महत्त्व वाढले आहे. भाजप सध्या ज्या बूथनिहाय कमिट्या नेमत आहे, ती मूळ संकल्पना शिवसेनेची आहे. त्यामुळे गटप्रमुखांना ताकद दिली पाहिजे. समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी नेत्यांनी मीपणा, सोडून सामान्य कार्यकत्र्याला महत्त्व दिले पाहिजे.

सामान्यांमध्ये भाजपविरोधात रोष तर, काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल लोकांना तिटकारा आहे. २०१४ मधील राजकीय परिस्थिती कमालीची बदलली आहे. २०१९ चा सूर्य शिवसेनेसाठी उगविणार आहे. आगामी निवडणुकीत मावळ-शिरूरचे खासदार शिवसेनेचेच असतील. तर, पिंपरी, चिंचवड आणि भोसरीचे आमदार शिवसेनेचेच असतील, अशी पक्की खुणगाठ मनात बांधा, असेही खासदार राऊत म्हणाले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, यापुढील काळात पक्षसंघटनेचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, पक्षादेश पाळणाऱ्यांनाच कामाची संधी दिली जाईल. त्यासाठी विश्वासातील माणसं नेमली जातील. यावेळी गोविंद घोळवे, गजानन चिंचवडे, योगेश बाबर, अनंत कोऱ्हाळे, धनंजय आल्हाट, प्रमोद कुटे, सुलभा उबाळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

कामगारांचे प्रश्न आक्रमकपणे मांडा
मुंबई-ठाण्यातील मजूर, श्रमिक, कामगारांमुळे शिवसेना वाढली, रुजली आणि विस्तारली, असा दाखला देत खासदार संजय राऊत म्हणाले, कामगारवर्ग ही शिवसेनेची मोठी ताकद आहे. हक्काच्या न्याय मागण्यांसाठी त्यांना शिवसेनेचा आधार वाटतो. शिवसेनाच आपल्यासाठी लढू शकते, असा कामगारांचा विश्वास कायम आहे. पिंपरी-चिंचवड ही कामगारनगरी आहे. येथील कामगारही शिवसेनेशी जोडला गेला आहे. त्यामुळे कामगारांवर अन्याय होत असल्यास त्याविरोधात आवाज उठवा, त्यांचे नेतृत्त्व करा, असे मार्गदर्शनही राऊत यांनी केले.

summary- sanjay raut praised gatpramukh work for shivsena