राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे -संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात सोमवारी चर्चा झाली. यावेळी काही सदस्य उपस्थित नव्हते. त्याची माहिती त्यांनी दिली आहे. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आल्याचे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

भाजपप्रणीत आघाडीकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपद्री मुर्मू या आदिवासी महिला आहेत. तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा हे उमेदवार आहेत. या दोघांबाबतही बैठकीत चर्चा झाली. याआधीही शिवसेनेने राजकारणापलीकडे विचार करत योग्य व्यक्तींना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी पाठबळ दिले आहे. त्यात टी.एन. शेषन, प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांचा समावेश आहे. असे निर्णय शिवसेनेने राजकारणापलीकडे जात घेतले आहेत. या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीबाबतची चर्चा झाली. सर्व खासदारांनी याबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, तो आमचे खासदार आणि आमदारांना बंधनकारक असेल. पक्षप्रमुखांचा जो निर्णय असेल, त्या निर्णयासोबत आपण आहोत, असेही ते म्हणाले. याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, आमचे पक्षप्रमुख निर्णय घेण्यास समर्थ आहेत, असेही संजय राऊत म्हणाले. त्यांचा निर्णय योग्यच असेल. राज्याच्या आणि देशाच्या भावना समजून ते निर्णय घेतील. त्या निर्णयमागे आमचे खासदार आणि आमदार उभे राहतील.

शिवसेना ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे. त्यामुळे पक्षातील कोणालाही पदावरून हटवण्याचे किंवा नेमण्याचे अधिकार पक्षप्रमुखांना आहेत. हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या हकालपट्टीची बातमी सामनामध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे ते काय म्हणतात, याला महत्व नाही.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे सर्वांचे गुरु आहेत. त्यांच्यासारखा गुरु लाभणे, ही भाग्याची गोष्ट आहे. ते गुरु म्हणून आम्हाला लाभले, त्यांनी आम्हाला घडवले, त्यांनी आम्हाला दिशा दाखवली. त्यांनी शिवसेना निर्माण केली. अशा गुरुंना मानवंदना देणे, हे आमचे कर्तव्य आहे. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आम्हाला गुरुस्थानी आहेत, असेही ते म्हणाले.