
शंभर दिवसांत महागाई कमी करण्याच्या थापा मारून भाजपने मते मिळवली. मात्र, सत्तेवर येताच त्यांना सर्वसामान्यांचा विसर पडला. आता महागाईबद्दल प्रश्न विचारला की राज्यात जातीय तणाव निर्माण केला जातो. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा वापर करून राज्यातील महाविकास आघाडीचे अस्थिर करण्याचे कारस्थान रचण्यात येत आहे. पण या कारस्थानाच्या छाताडावर पाय रोवून शिवसेना देश पादाक्रांत करेल. उगाच आगीशी खेळ करू नका, भस्मसात व्हाल, असा खणखणीत इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना दिला.
स्मृती इराणींना 50 सिलिंडर देतो…
2014 मध्ये महागाईच्या प्रश्नावर आंदोलन करताना भाजपच्या नेत्या स्मृती इराणी या गॅस सिलिंडर घेऊन नाचत होत्या. आता गॅस हजाराच्या पुढे गेला आहे. इराणी काय करताहेत? त्यांनी महागाईच्या विरोधात आंदोलन करावे, येथून त्यांना 50 रिकामे सिलिंडर पाठवतो, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणामुळे 12 हजार छोटय़ा व्यापाऱयांनी आत्महत्या केली एअर इंडिया विकले… त्याची किमंत 17 हजार कोटी रुपये आणि आपले पंतप्रधान 18 हजार कोटी रुपयांचे विमान घेतात. ही देशाची स्थिती असल्याची खंत यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केली.
महागाईवर विचारले की दंगली होतात
केंद्रातल्या सरकारला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. वास्तवाबद्दल विचारले की यांचे बिनसते. महागाई, बेरोजगारी, शेती, शेतकरी, तरुण, आरोग्य अशा प्रश्नांवर विचारले की, लगेच जातीय तणावाच्या घटना घडू लागतात. हिंदुस्थान-पाकिस्तान, चीनची घुसखोरी, सर्जिकल स्ट्राईक, हिंदू-मुस्लिम असे चर्वितचर्वण सुरू होते. हिंमत असेल तर मोदी सरकारने महागाईवर बोलावे, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.




























































