पुढील वर्षी लाल किल्ल्यावर इंडिया आघाडीचा पंतप्रधान ध्वजारोहण करणार!

पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 साली होणाऱ्या स्वातंत्रदिनी लाल किल्ल्यावर झेंडा हा ‘इंडिया’आघाडीचाच पंतप्रधान फडकावेल असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले की, पुढच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदी ध्वजारोहणाचा कार्यक्रम गुजरातमधील-दिल्लीतील आपल्या घरी बसून पाहतील अथवा माजी पंतप्रधान म्हणून समोर बसून पाहतील. पंतप्रधान मोदींशी आमचा व्यक्तिगत वाद असण्याचे कारण नाही मात्र सुडाचे, बदल्याचं राजकारण त्यांनी सुरू केलं आहे त्यामुळे विरोधक एकत्र आले. इंडिया आघाडी इतकी घट्ट झाली आहे की आम्ही 2024 च्या निवडणुका जिंकू आणि पुढील स्वातंत्रदिनी ‘इंडिया’ आघाडीचे जे पंतप्रधान होतील ते ध्वजारोहण करतील असे राऊत यांनी म्हटले.

अजित पवारांनी शरद पवार यांना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिल्याच्या वृत्ताबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, अजित पवार हे काही इतके मोठे नेते नाही जे शरद पवार यांना ऑफर देतील. अजित पवारांना शरद पवारांनी घडवले आहे. अजित पवारांनी शरद पवारांना घडवलेले नाही. शरद पवारांची राजकारणातील उंची फार मोठी आहे, त्यांना अजित पवार हसन मुश्रीफ यांच्यासारखी छोटी मंडळी कशी ऑफर देतील, असं कधी होतं का राजकारणात ?असा सवालही राऊत यांनी यानिमित्ताने विचारला आहे.

राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, “मविआ मजबुतीने उभी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आहेत आणि राहतील. हे तीन पक्ष मविआमध्येही राहतील आणि इंडिया आघाडीतही राहतील. शरद पवार हे त्यांच्या हयातीमध्ये भाजपसोबत कधी हातमिळवणी करतील असे मला वाटत नाही आणि ते करणार नाहीत. ते नव्याने पक्षबांधणीसाठी बाहेर पडले आहेत. एका जिद्दीने ते मैदानात पुन्हा उतरले आहेत. सोडून गेलेल्यांशी संबंध उरलेला नाही असे त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसत आहे. एखाददुसऱ्या भेटीतून असा अर्थ काढणे योग्य नाही. कालच माझे आणि त्यांचे फोनवर बोलणे झाले. ही चर्चा खासकरून मुंबईतील इंडियाच्या बैठकीसंदर्भात होती.