पंतप्रधान मोदींनी स्वतःच वधस्तंभाकडे गेले पाहिजे, दुसऱ्या नोटाबंदीवरून संजय राऊत यांचा भीमटोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

8 नोव्हेंबर 2016 रोजी एकाएकी नोटाबंदीची घोषणा करून ‘माझी काही चूक झाल्यास मला भरचौकात फाशी द्या,’ असे जाहीर विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. नोटाबंदीचा फायदा कुणालाही झालेला नाही. त्यामुळे लोकांनीच आता चौकाचौकांत जाहीर फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच वधस्तंभाकडे गेले पाहिजे, असा भीमटोला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत हे महाप्रबोधन यात्रेच्या समारोपानिमित्ताने बीड येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी दोन हजार रुपयांच्या करण्यात आलेल्या नोटाबंदीवरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटाबंदी जाहीर केली. ही नोटाबंदी करताना त्यांनी मला फक्त 50 दिवसांचा अवधी द्या. सर्व काही ठीक होईल, त्यानंतरही जनतेला त्रास झाल्यास मला भरचौकात जाहीर फाशी द्या, असे म्हटले होते. नोटाबंदीचा फायदा झाला असे सांगणारा एक जणही समोर आला नाही. नोटाबंदीचा कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे लोकांनीच चौकाचौकांत जाहीर फाशीचा कार्यक्रम ठेवला पाहिजे. पंतप्रधान मोदींनी स्वतःच वधस्तंभाकडे गेले पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः मी देशाचे किती नुकसान केले, याची माहिती दिली पाहिजे. नोटाबंदीमुळे देशात बेरोजगारी वाढली, महागाई वाढली. लहान उद्योग, व्यापार बंद पडले. नोटाबंदीनंतर परदेशातील काळा पैसा परत येईल, असेही मोदी म्हणाले होते. गेल्या सहा वर्षांत किती काळा पैसा परत आला, असा सवाल शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केला. नोटाबंदीमुळे दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद बंद होईल, असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी केला होता, मात्र आज कश्मीरात काय स्थिती आहे हे पत्रकारांनीच जाऊन पहावे, असे ते म्हणाले.

पंकजांची घुसमट होत असेल तर त्यांनी निर्भयपणे पुढे यावे

महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा पेच निर्माण होतो तेव्हा आवर्जून गोपीनाथ मुंडे यांची आठवण होते. आम्ही अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, गोपीनाथ मुंडे यांचा भाजप पाहिला आहे, पण आता हे चित्र दिसत नाही. गोपीनाथराव ज्या बेडरपणे राजकारणात वावरले, झुंजले हीच अपेक्षा पंकजांकडून आहे. पंकजांची घुसमट होत असेल तर त्यांनी वडिलांप्रमाणेच निर्भयपणाने समोर यायला पाहिजे, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले.