
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे तीन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आज संजय राऊत यांनी मेळावा घेत विरोधकांवर तोफ डागली. यावेळी त्यांनी केंद्र सरकार, भाजप, वाढती महागाई, संभाजी राजेंवरून सुरू असलेले भाजपचे राजकारण या सगळ्याचाच खरपूस समाचार घेतला.
”सध्या समाजात शिक्षणाचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे. यांना महागाईचा प्रश्न विचारला तर ते सांगतात ज्ञानवापी मशीद नाही ते मंदिर आहे त्याला ताब्यात घेत आहोत. अरे आमचा प्रश्न काय, तुम्ही उत्तर काय देता. 300 पटीने महागाई वाढली आहे. तेवढं आमचं उत्पन्न वाढलं आहे का? कधी मशीदीवर येतात, कधी लाऊडस्पिकरवर येतील, हिजाबवर येतील, हिंदू मुसलमानावर येतील, अगदीच काही नाही तर पाकिस्तानवर जातील. हिंमत असेल तर चीनकडे जा. आहे का हिंमत… पेट्रोलचा भाव शंभरच्या वर आहे. एक गाणं आहे हिंदीत… ”चलो दिलदार चलो चाँद के पार चलो” तसं पेट्रोल डिझेलला सांगतयं… सौ के पार चलो” अशी या देशाची परिस्थिती आहे”, अशा शब्दात संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
”महाराष्ट्रात देशात आमच्या सारख्यांनी बोलायचं नाही. आम्ही बोलतो प्रश्न विचारतो मग आच्याकडे ईडी घुसवायची. आमचे मंत्री अनिल परब यांच्याकडे ईडीचे लोक गेले होते. कारण समजलं पाहिजे सर्वांना दापोलीला जे रिसॉर्ट आहे. जे चालूच झालं नाही. त्यातून सांडपाणी समुद्रात जातंय. म्हणून मुंबईत धाडी. हे काय ईडीचं काम आहे. तुम्ही आर्थिक गुन्हे शोधणारी माणसं आहात. हजारो कोटींचे गुन्हे शोधता. अशा प्रकारच्या सूडाच्या कारावया संपूर्ण शिवसेनेवर सुरू आहेत. महाराष्ट्रात ठाकरेंच्या नेतृत्वात राज्य सुरू आहे. ते राज्य विस्कळीत करायचं. ते राज्य चालू द्यायचं नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री बघितला की यांच्या पोटात दुखतं. आणि मग हे सगळं उपद्व्याप सुरू होतात. पण या सगळ्यांना पुरून उरून शिवसेना महाराष्ट्रात उभी राहणार, असे संजय राऊत यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
”संजय पवार दिल्लीला चालले आहेत. त्यांना म्हटलं हळू हळू हिंदीत बोलायची प्रॅक्टिस करा. आता कोल्हापूरच्य़ा मराठी भाषेचं हिंदी कसं करायचं असा प्रश्न पडतो. कोल्हापूर भारीच आहे. पण शिवसेना कशी आहे. बाळासाहेब ठाकरे कसे होते. उद्धव ठाकरे कसे आहेत. वेळ आली तेव्हा एका सामान्य शिवसैनिकाला अलगद उचलला आणि दिल्लीच्या संसदेत नेऊन ठेवला. जागा कोणतीही असो. पहिली दुसरी किंवा सध्या गाजत असलेली सहावी असो. सहाव्या जागेचा वाद सुरू झाला. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं आभार व्यक्त करतो. त्यांनी संभ्रम दूर केला. शिवसेनाला बदनाम करायचा प्रयत्न देवेंद्र फडणवसींना सुरू केला होता. त्यांचा मुखवटा शाहू महाराजांनी टराटरा फाडला. आज छत्रपतींनी जाहीरपणे सांगितलं. संभाजीराजेंविषयी जो वाद सुरू आहे तो निरर्थक आहे. शिवसेनेने छत्रपती घराण्याचा अपमान केलेला नाही. त्यांनी कायम मान राखला आहे. शाहू महाराज असं म्हणाले की मी आजही मनाने शिवसैनिक आहे. हा आम्हाला अंबाबाईने दिलेला प्रसाद आहे असं मानतो. छत्रपती शाहू महाराजांचं वक्तव्य अंबाबाईचा आशिर्वाद आहे. आता भाजपवाल्यांनी शहाणे व्हा व हे कपटी कारस्थान बंद करा. फडणवीस बोलत होते. आम्ही छत्रपतींची कोंडी केली. पण आता कोंडी तुमची झाली”, अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावले
”भाजपने शिवसेनेला बदनाम करण्यासाठी, समाजामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी त्यांनी संभाजीराजेंचा गैरवापर केला. पण आज प्रत्यक्ष शाहू महाराजांनी त्यांचा मुखवटा फाडला. महाराष्ट्रावर संकंट दिल्ली्च्या माध्यमातून सातत्याने येत आहे. कामच करू द्य़ायचं नाही. सतत भ्रष्टाचार भ्रष्टाचार ओरडायचं. अरे मग राज्य कसं चाललंय. सतत कामं सुरू आहेत. यापुढेही करू. सगळ्यात भ्रष्ट पक्ष कोणता असेल तर तो भाजप आहे. भाजपच्या तिजोरीत साडे पाच हजार कोटी अधिकृत आहेत. सगळ्यात श्रीमंत पक्ष. पैसे कुठून आले. है पैसे तुम्हाला उद्योगपती, व्यापारी, बिल्डर देतात. मग तुम्ही त्यांची कामं करतात. तुम्ही काय आम्हाला काय भ्रष्टाचाराचं सांगता. आमच्या अंगावर याल तर सोडणार नाही ही बाळासाहेबांची शिवसेना आहे”, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.
”कोल्हापूरमध्ये. सहा आमदार होते त्यातले पाच का गेले. एवढं प्रचंड काम करायचं की सहाच्या सहा आले पाहिजे. आता तीन खासदार झाले आहेत. आता सहा आमदार आले पाहिजे. त्याआधी कोल्हापूरची महानगर पालिका. चंपा तुमच्या कोल्हापूरचीच चंपाबाईना. आता कोल्हापूरात येत नाही. कोल्हापूरवाले हाकलून देतात. कोल्हापूरची महानगरपालिका. एवढा मोठा पक्ष. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आता चार नगरसेवकांवर थाबायचं नाही. आता कोल्हापूरचा महापौर हा शिवसेनेच्या मदतीशिवाय होणार नाहीय एवढा आकडा आणला पाहिजे. हे पड़द्यामागचं राजकारण बंद करा. आमचं ठरलंय वैगेरे जे चाललंय ते बंद करा. आता आमच्याशिवाय काही ठरू देणार नाही. आता शिवसेनाला डावलून काही ठरवाल तर लक्षात ठेवाल तुमच्या खुर्च्या हलवल्याशिवाय राहणार नाही. आता जे काही ठरेल ते शिवसेनेसोबत. नाहीतर तुमच्याशिवाय काय करायचं याची गुरुकिल्ली आमच्याकडे आहे. कोल्हापूरची महानगर पालिकेवर सुद्धा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागलं पाहिजे,” असे संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावले.




























































