संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास आराखडा तयार करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा सर्वंकष विकास करताना या परिसरात पर्यटकांची संख्या वाढावी याकरिता या उद्यान परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्यादृष्टीने सर्वसमावेशक आराखडा, संकल्पना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची दुरवस्था झाल्याने त्याचे नूतनीकरण करून हे उद्यान विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागारांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. हे उद्यान विकसित करताना जनतेच्या आशा, अपेक्षा जाणून घेण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्याशिवाय स्पर्धात्मक पद्धतीने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि जनतेकडून उद्यान विकासाचे आराखडे मागविण्यात आले होते. संभाजीनगरातील एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आराखडय़ाचे तसेच वास्तुविशारद पी. के. दास यांनी तयार केलेल्या आराखडय़ाचे बैठकीत सादरीकरण करण्यात आले.