मालवणमध्ये ‘सान जॉव’ उत्साहात, जलाशयात उड्या मारत ख्रिस्ती बांधवांचा जल्लोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण तालुक्यात ख्रिस्ती बांधवांचा पारंपरिक आणि धार्मिक उत्साहाचा सण ‘सान जॉव’ उत्साही वातावरणात पार पडला. ख्रिस्ती बांधवांनी जलाशयात उड्या मारत जल्लोष साजरा केला.

मालवण, देवबाग, चिंदर परिसरातील ख्रिस्ती बांधवांनी या सणाची जय्यत तयारी केली होती. या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे पानाफुलांपासून तयार करण्यात आलेले आकर्षक मुकुट, ज्याला स्थानिक भाषेत ‘कोपेल’ असे म्हणतात. आबालवृद्धांनी हे रंगीबेरंगी कोपेल डोक्यावर परिधान करून ‘सान जॉव’च्या जोरदार घोषणा दिल्या. पावसाची रिमझिम आणि डीजेच्या गजरात ‘सान जॉव… सान जॉव…’ चा गजर केला.

मालवणातील विविध गावांमध्ये तरुणांनी एकत्र येत पारंपरिक गीतांच्या तालावर नाचत सण साजरा केला. यामध्ये केवळ ख्रिस्ती बांधवच नव्हे, तर इतर समाजांतील नागरिकही सहभागी झाले होते. एकमेकांच्या घरी जाऊन फळे आणि मिठाईचे वाटप करून सणाच्या शुभेच्छा दिल्या. “पावसाच्या आगमनासोबत आमच्या संस्कृतीतील हा सण आम्हाला एकत्र आणतो आणि बंधुभाव वाढवतो,” असे ख्रिस्ती बांधवांनी सांगितले.

‘सान जॉव’ म्हणजे काय?

‘सान जॉव’ हा ख्रिस्ती बांधवांचा पारंपरिक आणि धार्मिक उत्सव आहे. ‘सान जॉव’चा मुख्य सोहळा म्हणजे विहिरींमध्ये किंवा जलाशयांमध्ये उड्या मारल्या जातात. सेंट जॉन द बाप्टिस्ट यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ साजरा होणाऱ्या या सणामध्ये, येशू ख्रिस्ताच्या आगमनाने सेंट जॉन यांनी मातेच्या गर्भात मारलेल्या आनंदाच्या उडीचे प्रतीक म्हणून विहिरीत उड्या मारण्याची प्रथा आहे. सणाच्या दिवशी पारंपरिक पक्वान्न, तसेच तांदूळ, गूळ आणि खोबऱ्यापासून बनवलेले ‘सान्ना’ व ‘पातोळ्या’ यांसारख्या गोड पदार्थांचा आस्वाद घेतला जातो.