
कळंब तालुक्यातील पानगाव येथील गायरान जमीन अतिक्रमण प्रकरणात पारधी समाजाच्या दहशतीने दलीत समाजाचे सरपंच माणिक ओव्हाळ तीन दिवसांपासून भीतीपोटी लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पारध्यांची बाजू घेत गावकऱ्यांवरच गुन्हे दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईविरोधात येरमाळा बंद पाळण्यात येत आहे.
पानगाव येथील गायरान जमिनीवर 26 एकरवर पारधी समाजाने एका वर्षापासून अतिक्रमण केल्याचा आरोप होत आहे. या जमिनीवर वन विभागाचा ताबा असल्याने त्यावर झाडे होती. या गायरान जमिनीवरील झाडे जेसीबीने काढण्यात येत असल्याने सरपंच माणिक ओव्हाळ आणि गावकऱ्यांनी त्याला विरोध केला. गावकऱ्यांनी ही माहिती पोलीस आणि वनविभागाला दिली. हा प्रकार सोमवारी (ता. 16) घडला आहे.
या घटनेनंतर पारधी समाजाच्या लोकांनी या प्रकरणी सरपंच ओव्हाळ यांना धमकावत बघून घेतो, अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे. त्यामुळे गावकरी आणि पारधी समाजात तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी दोन्ही बाजूकडील दगडफेकीत 9 जण जखमी झाले होते. तसेच गावकऱ्यांनी पारधी समाजाची घरे पेटवून दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हा तणाव पोलिसांनी त्या दिवशीच मिटवला.
पारधी समाजाने केलेले २6 एकरवरील गायरान अतिक्रमण पोलीस व वनविभागाने मोठ्या फौजफाट्यासह हटवले असले तरी बुधवारी रात्री पारधी समाजातील एका व्यक्तीचा मृतदेह येरमाळा पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आला होता. त्यामुळे काही काळ बार्शी कळंब रस्त्याची वाहतूक बंद झाली होती काही काळानंतर हा तणाव निवळण्यात पोलीसांना यश आले.
दरम्यान, झोपड्याजळीत प्रकरणी 50 गावकऱ्यांवरच पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने पोलिसांविरोधात रोष निर्माण झाला आहे. या सर्व प्रकरणात गावकऱ्यांमधे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दहशतीमुळे अनेकांनी गाव सोडल्याचे सांगण्यात येत आहे. पानगाव येथील सरपंच माणिक ओव्हाळ यांना पारधी समाजातील लोकांनी मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होत आहे. या घटनांनी गावात दहशत निर्माण झाली आहे. पारधी समाजाने केलेले अतीक्रमण हटवण्यात यावे, तसेच होणांऱ्या चोऱ्यांचा शोध पोलीसांनी घ्यावा, या मागणीसाठी येरमाळा बंद ठेवण्यात आले होते .
पानगाव येथील प्रकरणात पारधी समाजाच्या दहशतीने गावकरी घाबरले असून पारधी समाजाच्या तक्रारीवरून पन्नास गावकऱ्यांवर अॅट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सरपंच तंटा मुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील यांचाही समावेश आहे. गावकरी घाबरल्याने पारधी समाजाविरोधात तक्रार देण्यास कुणीही पुढे येत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे याबाबत तक्रार आली नसल्याचे सह पोलीस निरिक्षक दिनकर गोरे यांनी सांगितले.






























































