पंचायत सदस्याला मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली, सरपंचावर अपात्रतेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

ग्रामपंचायतीतील सभा नेहमीच वादळी ठरतात असा अनुभव आहे. एक वेळ खासदारकीची निवडणूक सोपी पण ग्रामपंचायत निवडणूक महाकठीण असं राजकीय तज्ज्ञ सांगतात. गावगाड्याचं राजकारण सोपं नसत. नेहमीच दोन गटात वादविवाद आणि वितुष्ट निर्माण होतं, हा नेहमीचाच प्रकार आहे. असाच काहीसा प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील पुनवट येथे बघावयास मिळाला.

पुनवट ग्रामपंचायत मासिक सभेत एका विषयावरील चर्चेदरम्यान वाद झाला. महिला सरपंचांनी यावेळी पतीला फोन करून बोलावून घेतले. या पतिदेवांनी ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केली. हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्हीत कैद झाले. याप्रकरणी चौकशीअंती आयुक्तांनी सीसीटीव्हीत कैद झालेल्या चित्रफितीच्या आधारे सरपंचांना अपात्र घोषित केले आहे.

पुनवट ग्रामपंचायतीत 19 सप्टेंबर 2022 ला मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष टेंभूर्डे यांनी काही विषयांवर आक्षेप घेत सरपंच पौर्णिमा संदीप राजूरकर यांना विचारणा केली. यावेळी वाद निर्माण झाला. सरतेशेवटी महिला सरपंचांनी फोन करून पतीला ग्रामपंचायतीत बोलावले. महिला सरपंचाचे पती संदीप राजूरकर यांनी थेट ग्रामपंचायत गाठून सदस्य संतोष टेंभूर्डे याला बेदम मारहाण केली असा आरोप दाखल तक्रारीत करण्यात आला होता. याप्रकरणी गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून विस्तृत अहवाल सादर करण्यात आला.

मासिक सभेच्या वेळी सात सदस्य उपस्थित होते तर काही सदस्य निघून गेले होते. चौकशी दरम्यान काही ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक सभेच्या वेळी अशी घटना घडलीच नाही असा जबाब नोंदवला. मात्र ग्रामपंचायतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घडलेली घटना कैद झाली होती. पुनवट ग्रामपंचायतीत घडलेल्या घटनेची विस्तृत चौकशी केल्यानंतर विभागीय आयुक्त अमरावती यांनी पौर्णिमा संदिप राजूरकर सरपंच ग्रामपंचायत पुनवट यांना अपात्र ठरवले आहे. त्यांनी कर्तव्यात कसुर तथा गैरवर्तणूक केल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959 चे कलम 39 (1) मधील तरतुदीनुसार त्यांना सदस्य तथा सरपंच ग्रामपंचायत पुनवट या पदाकरीता अपात्र घोषित करण्यात आले. काही सदस्यांनी मारहाण झालीच नाही असा जरी पवित्र घेतला असला तरी सीसीटीव्हीत सत्य उघड झाले आणि सरपंच पदाला मुकावे लागले.