साताऱ्याची शेफ

386

>> शेफ विष्णु मनोहर

स्वाती देसाई. बरीचजणं स्वतःतील कलागुणांना वाव पुण्यामुंबईसारख्या शहरात येऊन देतात. पण स्वातींनी आपली आवड साताऱ्यातच जोपासली आहे.

स्वाती देसाई या होम शेफ आहेत, त्याचबरोबर त्यांनी 2019 मध्ये ’मिसेस इंडिया’ हा ऍवॉर्ड मिळवला आहे. याशिवाय त्या एका थ्री स्टार हॉटेलच्या संचालक मंडळात आहेत. त्यांनी फुड टेक्नॉलॉजी यामध्ये प्राविण्य मिळवले आहे. वेगवेगळया प्रकारचे कलात्मक केक तयार करून त्याची प्रदर्शने भरवणे, केक तयार करण्याचे क्लासेस घेणे हा त्यांचा आवडता छंद.

माझी आणि त्यांची ओळख अशाच एका केक वर्कशॉपमध्ये झाली होती. मुळात त्या कष्टाळू व शांत स्वभावाच्या. त्या निमूटपणे प्रत्येक काम करतांना दिसायच्या. काम करतांना त्यांची वेगळी पद्धत केकच्या डिझाईन्सवरून मला लक्षात आली. जेव्हा त्यांच्याबरोबर ’लंच डेट’ ला जायचे ठरवले तर त्या म्हणाल्यात सर तुम्हाला झणझणीत प्रकार आवडतात असे मला ठाऊक आहे. मी मूळ साताऱयाची. त्यामुळे आमच्याकडील जेवण तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे, तुम्ही घरीच जेवायला या?

मुंबईला त्यांच्या घरी लंच डेटला गेल्यावर ताज्या पदार्थांचा घमघमाट सुटला होता. त्यामध्ये झणझणीत अंडा करी, पनीर पसंदा, साताऱयाच्या स्टाईलच्या चपात्या, जिरा राईस, रसमलाई हे सर्व माझे आवडते पदार्थ डायनिंग टेबलवर वाट पाहात होते. जेव्हा त्यांना पहिला प्रश्न विचारला की, तुम्ही एवढया वेगवेगळया पातळीवर काम करत असतांना तुम्ही कुकींग हा विषय कसा हाताळता. त्यावर त्या म्हणाल्यात मुळात मी फुड टेक्नॉलॉजिस्ट, काही वर्ष कॅडबरी कंपनीत नोकरी केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरु केला. त्यात मला जास्त आनंद मिळत होता आणि आपण आवडते काम केले तर त्याचे कष्ट भासत नाहीत. बेकरी, चॉकलेट, केक्स्, पेस्ट्रीजच्या जगात राहून हे पदार्थ करायला जेवढे आवडतात तेवढे मात्र खायला आवडत नाही. मला चमचमीत जेवण आवडतं, त्यामध्ये सावजी प्रकार, कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, याशिवाय साताऱयाकडील असल्यामुळे तिकडले गावठी प्रकार जसे, तेलातली वांगी, पिठलं, गोळाची काकवी, इत्यादी प्रकार आवडतात. गोडामध्ये नागपूरची संत्रा बर्फी दिवसरात्र खायला सांगितली तरी खाऊ शकेल एवढी आवडते.

मुळात नॉनव्हेज आवडत असल्यामुळे हिंदुस्थान आणि हिंदुस्थानाबाहेर जेवणाविषयी कधीच अडचण आली नाही. प्रत्येक देशाचं जेवण मी आपलसं करुन घेतलं आहे. कधी कधी तिथल्या किचनमध्ये जाऊन मला आवडणाऱया चवीचं जेवण बनवून घेते. आपलं आवडीचं रेस्टॉरेंट कोणतं हा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या, माझं आवडतं रेस्टॉरेंट म्हणजे वांद्रेs-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जीक्स कारला यांचं ‘मसाला फॅक्टरी’. कारण इथे साध्या हिंदुस्थानी व पारंपरिक पदार्थांना नविनतेची जोड देऊन यंगस्टरला आवडतील असे तयार करतात. याशिवाय मुंबईतील बाबुलनाथ मंदिर समोरील ’सोम’ रेस्टॉरेंट तेथील गुजराती पदार्थांच्या खासियतमुळे विशेष आवडते. जेव्हा त्यांना म्हटलं तुम्ही सतत वेगवेगळया प्रकारच्या टेम्पटींग अशा खाद्यपदार्थांमध्ये असता. तर ज्यावेळी ‘मिसेस इंडीया’ कॉम्पीटीशन झाली त्यावेळी तुम्ही स्वतःला कसे मेंन्टेन ठेवले. तर त्या म्हणाल्या, मला हा किताब जिंकायचाच होता त्यामुळे मी दिवसरात्र खूप मेहनत केली. वेगवेगळे ग्रुमींग सेशन अटेंड केले, याशिवाय गोड आणि तळलेले पदार्थ वर्ज केले. दिवसातून तीनदा जिमला जाणे व शक्यतो फ्रुट किंवा सॅलडवर राहून आपली दिनचर्या घालवणे हेच लक्ष होतं.

सध्या त्या सातारा येथील ’फन रिपब्लीक’ हॉटेलच्या संचालक पदावर कार्यरत आहे. जेवण सुरू असताना फ्रुट केकचा मंद सुवास येत होता. जेवताना मनात एक सुप्त इच्छा होती, की हा केक त्यांनी मला दयावा. नंतर जेवण आटोपल्यावर जाताना तो सुंदर केक मला बॉक्समध्ये पॅकिंग करून दिला येथेच आमची लंच डेट संपली.

खसखसची भाजी
साहित्य – 2 वाटया भिजलेली खसखस , अर्धी वाटी किसलेला कांदा, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, हिरवी कोथिंबीर, 1 चमचा धणे जिरे पावडर, पाव चमचा हिंग, 4 चमचे तेल, 2-3 लवंग, 2-3 तेजपान, अर्धा चमचा काळा मसाला.
कृती – पातेल्यात तेल घालावे. तेल तापल्यावर त्यात लवंगा, तेजपान घालावे. फोडणी चांगली झाल्यावर त्यात लसूण पेस्ट व किसलेला कांदा घालून परतावे. भिजलेली खसखस पाटा वरवंटय़ावर किंवा मिक्सरवर वाटून घ्यावी. कांदा लालसर झाल्यावर त्यात खसखस तेल सुटेस्तोवर शिजवावी. नंतर त्यात उरलेले मसाले आलं व चवीनुसार मीठ घालून, थोडे पाणी घालून, थोडे परतून ही भाजी पोळी बरोबर खायला दयावी. अतिशय वेगळी आणि रुचकर अशी ही भाजी होते.

कोल्हापुरी तांबडा रस्सा
साहित्य – अर्धा वाटी तीळ भिजवलेले, 1 चमचा जिरे, 3 ते 4 लवंग, अर्धा चमचा दालचिनी, 5 ते 6 काळी, अर्धा वाटी ओलं खोबरं, अर्धा वाटी सुकं खोबरं (खरपूस भाजून घेणे), 2 चमचे आलं-लसूणची पेस्ट, 5 चमचे कोल्हापूरी चटणी, अर्धा चमचा कोल्हापूरी सुका मसाला, पाव वाटी कोथिंबीर, पाऊण वाटी तेल, मीठ.
कृती – पाऊण वाटी तेलात जिरे, कांदे, लसणाची पेस्ट फोडणीला घालून खरपूस भाजून घ्यावी. उरलेले साहित्य एकत्र वाटून यात घालावे. चांगले परतल्यावर यात मटणाचे सूप, चवीनुसार मीठ घालून एकत्र उकळावे.

संत्रा बर्फी
साहित्य – 2 वाटी संत्र्याचा गर , 1 वाटी लाल कोहळयाचा नग, 1 वाटी साखर, अर्धी वाटी मिल्क पावडर, 10 पिस्ते, 5-6 पुदीन्याची पाने.
कृती – संत्र्याचा गर, लाल कोहळं (भोपळा) यात साखर घालून त्यातील पाणी आटेस्तोवर परतावे. मिश्रण थंड झाल्यावर त्यात एक चिमूट मीठ, मिल्क पावडर मिसळून त्याचे गोल संत्र्याच्या आकाराचे लाडू बनवावेत. त्यावर पिस्ते व पुदीन्याचे पान लावावे.

आपली प्रतिक्रिया द्या