सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांना धक्काबुक्की, आरोग्य विभागातील उपशाखेच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील कक्षात जाऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना गुरुवारी दुपारी दमदाटी, धक्काबुक्की तसेच शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोग्य विभागातील एका उपशाखेत काम करणाऱ्या कर्मचाऱयावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 राहुल जगताप (रा. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष जयसिंग चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण दुपारी चारच्या सुमारास ते कक्षात बसून शासकीय कामांचा निपटारा करत होते. यावेळी त्याठिकाणी राहुल जगताप हा आला. त्याने बाहेर थांबलेल्यांना दमदाटी करत त्यांच्याकडे असणारी कागदपत्रे फेकण्यास सुरुवात केली. बाहेर गोंधळ घातल्यानंतर जगताप हा डॉ. चव्हाण यांच्या कक्षात आला. त्याने डॉ. चव्हाण यांना शिवीगाळ, दमदाटी तसेच धक्काबुक्की करत कामात अडथळा निर्माण केला. आतील गोंधळ ऐकून जमलेल्या इतर कर्मचाऱयांनी जगताप याला बाजूला नेले. याची तक्रार डॉ. चव्हाण यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली असून, जगतापवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपनिरीक्षक बी. डी. मुसळे तपास करीत आहेत.

दरम्यान, राहुल जगतापने जिल्हा रुग्णालयाच्या आवारात थांबलेल्या कारडवाडी (ता. सातारा) येथील मंगेश उमेश चव्हाण या टेम्पोचालकास शिवीगाळ व मारहाण केली होती. मारहाण करत असतानाच राहुल जगतापने दारूसाठी पैसे मागत चव्हाण यांच्याकडील 500 रुपये हिसकावून नेले. याची तक्रार मंगेश चव्हाण यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली असून, जगतापवर जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहायक फौजदार डी. जी. पवार या गुह्याचा तपास करीत आहेत.

डॉक्टरांचे जिल्हाधिकारऱ्यांना निवेदन 

जिल्हाधिकाऱयांना निवेदन जिल्हा शल्यचिकित्सकांना झालेल्या धक्काबुक्की आणि शिवीगाळीचा निषेध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी केला. याबाबतचे निवेदन डॉ. सुभाष चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी, तसेच जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांना देण्यात आले. या निवेदनात राहुल जगतापला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. त्याच्यावर कारवाई न झाल्यास आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबल खच्ची होईल व त्याचा आरोग्यसेवेवर परिणाम होईल, असे निवेदनात म्हटले आहे.