युवतीने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव, सातारा शहरातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येथील एका महाविद्यालयीन युवतीचे अज्ञातांनी अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाने खळबळ उडवून दिली. मात्र, तपासात या घटनेत भलताच ट्विस्ट समोर आला. संबंधित युवती कास पठारावर फिरायला गेली होती. घरी परतण्यास उशीर झाल्याने घरी काय सांगायचे म्हणून तिने अपहरणाचा बनाव केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, या सर्व घटनेमुळे सातारा शहर पोलिसांचा मात्र घामटा निघाला.

शहरातील एका महाविद्यालयीन युवतीने घरी गेल्यानंतर तिच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. सायंकाळी ही घटना समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून सीसीटीव्ही तपासण्याचा व घटनास्थळी माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तीन ते चार तास पोलीस यावर काम करत होते. मात्र, ओमनी कार आली व त्यामध्ये बुरखाधारी युवकांनी तिचे अपहरण केल्याचे कुठेच दिसेना व कोणी तशी घटना पाहिल्याचेही सांगेना. भर वर्दळीच्या ठिकाणी अशी घटना कोणी पाहिली नसल्याने अखेर पोलिसांनी त्या युवतीवरच प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर तिने हा धक्कादायक खुलासा केला.

संबंधित युवती कास व यवतेश्वर घाटात फिरायला गेली होती. यामुळे तिला घरी पोहचायला उशीर झाला. कुटुंबीय याबाबत विचारणार, यामुळे तिने आपले अपहरण झाल्याचे खोटे सांगून बनाव केला. कुटुंबीयांना अपहरणाची माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. आपले गुपित पुâटणार यामुळे ती युवती गांगरली. अखेर पोलिसांनी तपासाची दिशा बदलल्यानंतर घटनेचे नेमके बिंग समोर आले आहे.