
सामना प्रतिनिधी । खेड
पावसाळा सुरु होताच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनिय होवू लागली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर दगड माती आल्याने वाहने हाकणेही मुश्किल झाले आहे. खाडीपट्टा परिसरातील सवणस-अणसपुरे या तीन किलोमिटरच्या मार्गावर दरडीची माती आणि दगड-गोठे आल्याने या मार्गावर वाहने हाकताना वाहन चालकांच्या पोटात भितीचा गोळा येऊ लागला आहे.
खेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत ८१४.८४० कि.मी ग्रामीण आणि१७०.६६ कि.मी.चे इतर जिल्हा मार्ग आहेत. या मार्गाच्या देखभालीची जबाबदारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे आहे. ग्रामीण भागाच्या विकासाचा रथ याच मार्गावरुन धावत असल्याने या रस्त्याची दुरुस्ती वेळेत करणे आवश्यक आहे. परंतू संबधित विभागाकडून रस्त्यांच्या दुरुस्तीकडे कायम दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनिय झालेली आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्रामस्थांना दैनंदिन कारभारासाठी नेहमीच तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. महाविद्यालयात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र रस्त्यांची दुरवस्था असल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते आहे. काही ग्रामस्थ व विद्यार्थ्यांकडे स्वतःची वाहने आहेत. परंतू खड्डेमय रस्त्यावरून वाहने हाकताना अपघातांबरोबरच वाहने नादुरुस्त होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना एसटी सेवेवरच अबलंबून रहावे लागत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामीण भागात धावणाऱया एसटीच्या गाड्या कधीच वेळापत्रकाप्रमाणे धावत नसल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ प्रवासातच वाया जात आहे.
खाडीपट्टा परिसरातील सवणस-अणसपुरे या तीन किलोमिटरच्या मार्गावर दरड कोसळली आहे. दरडीची माती-दगड रस्त्यावर आले असल्याने या मार्गावरील वाहतुक जवळजवळ बंदच झाली आहे. काही वाहन चालक धोका पत्करून मातीमुळे निसरड्य़ा झालेल्या रस्त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत परंतू कधी दरड कोसळेल आणि मातीचा ढिगारा अंगावर येईल याचा नेम नसल्याने वाहन चालक व प्रवाशांच्या पोटात भितीचा गोळा येऊ लागला आहे.































































