
गरीब नागरिकांना झिरो बॅलन्स किंवा बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाऊंट्स (बीएसबीडी) उघडण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (एसबीआय) जास्त शुल्क आकारले जाते असे पवई येथील आयआयटी मुंबईच्या अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे. सुमारे 12 कोटी झिरो बॅलन्स खात्यांवरून करण्यात येणाऱया व्यवहारांवर सेवा शुल्क आकारण्यात येते. त्या सेवा शुल्कातून एसबीआयने गेल्या पाच वर्षात 300 कोटी रुपये जमवले असे हा अहवाल सांगतो.
आयआयटी मुंबईच्या या अहवालात इतरही बँकेतील सेवा शुल्कांबाबत माहिती देण्यात आली आहे. देशातील दुसऱया क्रमांकाची सार्वजनिक बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेत 3.9 कोटी बीएसबीडी खाती आहेत. त्या बँकेनेही गेल्या पाच वर्षात या खात्यांवरील सेवा शुल्कातून 9.9 कोटी रुपये जमा केले. बीएसबीडीए खात्यांसाठी रिझर्व्ह बँकेने काही नियम घालून दिले आहेत. बीएसबीडीए खात्यातून महिन्याला चारपेक्षा जास्त व्यवहार झाले तरी त्यावर सेवा शुल्क आकारू नये असा हा नियम आहे. त्या नियमांचा काही बँका भंग करत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने एसबीआयचा उल्लेख करता येईल.































































