शिष्यवृत्ती, वसतिगृह प्रवेश पद्धती ऑनलाईन; विद्यार्थ्यांना चकरा माराव्या लागू नयेत यासाठी निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना, राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती, सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील प्रवेश पूर्णपणे संगणकीकृत करून ऑनलाईन पद्धतीने राबविण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत.

यापुढे विद्यार्थी व निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या लोकप्रतिनिधींना पासपोर्टच्या धर्तीवर जात प्रमाणपत्र पडताळणी करून मिळावी यासाठी ही प्रक्रियासुद्धा पूर्णपणे ऑनलाईन केली जावी, यात असलेल्या सर्व त्रुटी दूर करून पासपोर्टच्या धर्तीवर सुटसुटीत व अद्ययावत प्रणाली तातडीने विकसित करून कार्यान्वित केली जावी असे निर्देश धनंजय मुंडे यांनी आज सामाजिक न्याय विभागाच्या झालेल्या बैठकित संबंधित अधिकाऱयांना दिले आहेत.

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये 42 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात, परंतु त्यांना प्रवेशासाठी अर्ज करायला थेट जिल्हा समाज कल्याण कार्यालयात जावे लागते. त्याचप्रमाणे वसतिगृहात प्रवेश न मिळलेल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱया स्वाधार शिष्यवृत्तीची अर्ज व छाननी आदी प्रक्रिया देखील ऑफलाईन आहे. परदेश शिष्यवृत्ती सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिष्यवृत्ती योजनेची निवड प्रक्रिया आजच्या युगात ऑफलाईन असणे, भूषणावह नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.

ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जावी, यासाठीची कार्यपद्धती निश्चित करून एक महिन्याच्या आत ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित केली जावी असे धनंजय मुंडे म्हणाले.

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया पासपोर्टच्या धर्तीवर

सध्या सीईटी प्रवेश व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया पासपोर्टच्या धर्तीवर ऑनलाईन केली जावी, या प्रक्रियेमध्ये त्रुटी येणे किंवा विलंब होणे पूर्णपणे टाळून 100 टक्के पारदर्शक पद्धतीने काम केले जावे व ही प्रक्रिया एक महिन्याच्या आत कार्यान्वित केली जावी, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले.