शिक्षणाचा ‘मार्ग’ महागला… स्कूलबसची 15 टक्के भाडेवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी ‘स्कूलबस ओनर्स असोसिएशन’ने नवे नियम आणि निर्णय जारी केले आहेत. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षातही पालकांच्या खिशाला कात्री बसणार असून स्कूलबस मेंटेनन्स, इंधन दरवाढीमुळे बसच्या फीमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होणार आहे. तसेच मेट्रोच्या कामांमुळे ठिकठिकाणी खोदलेले रस्ते आणि खड्डे असलेल्या रस्त्यांवरून यापुढे स्कूलबस धावणार नाही.

स्कूलबस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी याविषयीचे निवेदन बुधवारी जारी केले. स्कूलबसची सेवा मुंबईतील मुख्य रस्त्यांसह गल्लोगल्लीतून सुरू आहे, मात्र बऱ्याच रस्त्यांवर खड्डे आहेत. शिवाय मेट्रोच्या व इतर कामांमुळे रस्त्यांवर खोदकाम सुरू असते. यामुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूककोंडीतून मार्ग काढत विद्यार्थ्यांना वेळेत घरी सोडण्याचे मोठे आव्हान स्कूलबससमोर आहे. काही वेळा चालक आणि वाहकांना पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून खड्डय़ांच्या रस्त्यांवर स्कूलबस न नेण्याच्या निर्णय असोसिएशनने घेतला असून यामुळे विद्यार्थी-पालकांच्या होणाऱ्या गैरसोयीला महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असे गर्ग यांनी स्पष्ट केले आहे.

…तर रास्ता रोको आंदोलन

13 पेक्षा कमी वाहतूक क्षमता असलेल्या वाहनांमधून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांवर आरटीओ अथवा वाहतूक पोलिसांनी कारवाई न केल्यास स्कूलबस ओनर्स असोसिएशनने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. न्यायालयाने अशा वाहनांना विद्यार्थी वाहतुकीचा परवाना देऊ नये असे आदेश देऊनही त्यांची अंमलबजावणी होत नाही. स्कूल व्हॅनवर कारवाई न करणाऱ्या आरटीओविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली जाणार आहे.

मुसळधार पाऊस, दंगल किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत स्कूलबस ओनर्स असोसिएशनला स्कूलबस बंद ठेवण्याचा अधिकार द्यावा.

जूनपासून मुंबईतील मुलुंड, वाशी, ऐरोली, दहिसर टोलनाक्यावर स्कूलबसेसकडून टोल आकारला जाऊ नये. या टोलमुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त 300 रुपये भरावे लागतात.