
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
शाळेची फी वेळेत भरली नाही म्हणून ५९ चिमुरड्यांना सुमारे पाच तास शाळेच्या तळघरात कोंडून ठेवण्याचा प्रकार दिल्लीतल्या एका शाळेने केला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या शाळेचे नाव राबिया गर्ल्स पब्लिक स्कूल असून ती राजधानीच्या बल्लीमारांन विभागात आहे. संतापजनक प्रकार म्हणजे या निरागस बालिकांना ४० डिग्री तापमानात साधा खाऊ आणि पाणीही न देता कैद्यांसारखे नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
दुपारी मुलींचे पालक त्यांना घरी नेण्यासाठी आले असता त्यांना हा प्रकार समजला. आपल्या मुलांची दीन अवस्था पाहून पालकही पार हडबडले. काही मातांना तर या प्रकाराने रडूही कोसळले. निष्पाप जीवांचा फीसाठी छळ करणाऱ्या राबिया स्कूल प्रशासनावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुलींचे पालक आणि नातेवाईकांनी केली आहे.
Delhi: Case has been registered against Rabea Girls’ Public School for allegedly illegally confining students in the basement of the premises on the grounds of default in payment of school fees.
— ANI (@ANI) July 10, 2018
राबिया पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापनाने ५९ छोट्या विद्यार्थिनींना शाळेच्या तळघरात बंद करून ठेवले होते. आम्ही आलो तेव्हा पालघरला बाहेरून कडी लावलेली होती आणि आतून मुलींच्या रडण्याचे आवाज येत होते, असा आरोप मुलींच्या पालकांनी केला असून शाळेच्या माणुसकीहीन कारभाराचा जाहीर निषेध केला आहे. विशेष म्हणजे अनेक पालकांनी जून महिन्याची फी भरल्याची पावती दाखवल्यावरही शाळेच्या मुख्याध्यापिका फरहा डिबा खान यांनी पालकांनाच दमदाटी केली. त्यामुळे पालक अधिकच संतापले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर दिल्लीसह देशभरात शाळेच्या निर्दयी कृत्याबाबत संतापाची लाट उसळली आहे.
बाल आयोगाने घेतली गंभीर दखल
दिल्लीच्या बाल अधिकार संरक्षण आयोगाने राबिया स्कूलच्या निर्दयी कृत्याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून त्याला जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन बाल आयोगाचे सदस्य अनुराग कुंडू यांनी पालकांना दिले आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत बोलण्यास शाळेचे चेअरपर्सन डॉ. नाहिद उस्मानी यांनी स्पष्ट नकार दिला आहे. चौकशीच्या वेळेस बोलेन, असे उद्दाम उत्तरही त्यांनी दिले.



























































