
बुलढाण्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या ऑटोला रेतीच्या टिप्परने बेलोरा येथे धडक दिली. गुरुवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात ऑटोमधील 5 वर्षांच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर इतर ६ विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला. संतप्त जमावाने ट्रकची तोडफोड केली.
शेंबा येथील सहकार विद्या मंदीर मध्ये केजी वन केजी टू मधील विद्यार्थ्यांना घेवून ऑटो दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास निघाला होता. त्याच दरम्यान समोरून भरधाव वेगात आलेल्या रेतीच्या टिप्परने ऑटोला जोरदार धडक दिली. यात ऑटोत बसलेले सर्व विद्यार्थी जखमी झाले. एका 5 वर्षांच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्याचे नाव आदित्य उमेश मुकूंद असून तो जवळा येथे राहत होता.
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. तोपर्यंत जमलेल्या जमावाने ट्रकची तोडफोड करीत आपला संताप व्यक्त केला. काँग्रेस आमदार राजेश एकडे घटनास्थळावर पोहोचले. बोराखेडी पोलीसही त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. अवैध रेती उत्खनन आणि वाहतूकीचा मुद्दा या अपघातामुळे ऐरणीवर आला आहे. आमदार एकडे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. जखमींना तत्काळ बुलढाण्याच्या रुग्णालयात रवाना करण्यात आले. जखमींवर उपचार सुरु आहेत.