जागतिक कीर्तीचे शिल्पकार भाऊ साठे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक महापुरुषांची शिल्पे हुबेहूब साकारणारे जागतिक कीर्तीचे शिल्पकार भाऊ साठे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. शिल्पकला प्रदीर्घ काळ आपल्या तनामनात रुजवणारा महान कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध मान्यवरांनी तीक्र दुःख व्यक्त केले आहे.

चार दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने भाऊ साठे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती काहीशी स्थिर झाल्यानंतर आज सकाळी त्यांना डिस्चार्जही दिला. मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास तब्येत खालावल्याने त्यांचे निधन झाले. भाऊ साठे यांच्यामागे मुलगा, सून, नात असा मोठा परिवार आहे. कल्याणमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या शिल्पकलेचा वारसा पुतणे सिद्धार्थ साठे हे समर्थपणे पुढे चालवत आहेत. साठे यांचे संपूर्ण घराणे हे कलेची साधना करणारे असून त्यांची दिवंगत पत्नी नेत्रा साठे यादेखील ख्यातनाम चित्रकार होत्या.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक असलेले शिल्पकार भाऊ साठे यांनी कल्याणच्या सांस्कृतिक तसेच सामाजिक व साहित्यिक चळवळीतही सहभाग घेतला. ज्येष्ठ चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्यासोबत कमर्शियल आर्टिस्ट म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी मॉडेलिंग व शिल्पकलेचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली. 6 जानेवारी 1959 रोजी त्यांनी बनवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या अश्वारूढ पुतळय़ाचे अनावरण माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते झाले होते.

यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते अनावरण

  • 1948 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातल्यानंतर तीन महिने तुरुंगवास
  • 25 वर्षे नोकरीसाठी दिल्लीत वास्तव्य
  • माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन ‘हेड स्टडी’ शिल्पाची निर्मिती
  • 10 ऑक्टोबर 1956 साली भाऊ साठे यांनी साकारलेल्या महात्मा गांधींच्या पुतळय़ाचे दिल्लीत डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते अनावरण
  • कल्याणच्या साठे वाडय़ात स्टुडिओची निर्मिती
  • गेट वे ऑफ इंडियासमोर असलेला शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा साठे यांनीच बनवला असून त्याचे अनावरण माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले.

कल्याण ते बकिंगहॅम पॅलेस…

  • कल्याणहून इंग्लंडमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन प्रिन्स फिलिप्स यांचे हुबेहूब शिल्प साकारणारे भाऊ साठे हे एकमेव कलाकार
  • लॉड माऊंट बॅटर्न यांच्याही इंग्लंडमधील घरी जाऊन त्यांचे शिल्प तयार केले
  • 2019 साली दांडीयात्रेचे बनवलेले शिल्प हे अखेरचे ठरले
  • 2020 मध्ये ‘आकार-जन्मकथा शिल्पांची’ हे पुस्तक लिहिले
  • माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ‘लाइव्ह शिल्प’ घरी जाऊन साकारले.