
अमित खोत । मालवण
वार्यांचा वाढलेला जोर आणि समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणाचा फटका मालवण तालुक्यातील देवबाग किनारपट्टी भागास बसला. उधाणाच्या अजस्र लाटांच्या तडाख्यात किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप झाली असून देवबाग येथे दगडी बंधारा उध्वस्त करीत समुद्राचे पाणी थेट वस्तीत घुसले. अमावास्ये दरम्यान समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर आणखी काही दिवस असाच राहण्याची शक्यता स्थानिक मच्छीमारांनी व्यक्त केली.
गेले काही दिवस कोसळणार्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र अमावास्येनंतरच्या समुद्री उधाणाचा फटका तालुक्याच्या किनारपट्टी भागास बसला आहे. समुद्राला आज आलेल्या मोठ्या भरतीमुळे अजस्र लाटा किनार्यावर धडकत होत्या. यात येथील बंदर जेटीलगत उभ्या करून ठेवलेल्या होड्यांच्या ठिकाणी समुद्राचे पाणी घुसले होते. बंदर जेटीवरून सुमारे दोन मीटर उंचीच्या लाटा जात होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत समुद्री उधाणाचा जोर कायम होता.
समुद्री उधाणाचा फटका आज देवबाग भांजीवाडा भागास बसला. समुद्राच्या अजस्र लाटांचे पाणी भरवस्तीत घुसले. लाटांचा मारा एवढा जबरदस्त होता की दगडी बंधारा उद्ध्वस्त झाला. या बंधार्यावरून पाणी आत घुसले. समुद्री उधाणाच्या पाण्यामुळे किनार्यालगतच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, प्रवीण लुडबे, मकरंद चोपडेकर यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
गेले दोन दिवस आचरा तसेच तोंडवळी मधलीवाडी तसेच तळाशील गावच्या किनारपट्टीची समुद्री उधाणामुळे मोठी धूप झाली आहे. कालच्या दिवशी काही ठिकाणी ३० मीटर तर काही ठिकाणी ४० मीटरपर्यंत उधाणाचे पाणी आत घुसल्याने वस्तीस धोका निर्माण झाला होता. आज समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे या दोन्ही गावातील किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. उधाणाचा जोर असाच कायम राहिल्यास तोंडवळी-तळाशिलमधील घरांना धोका पोचण्याची शक्यता आहे.
देवबाग किनारपट्टीवर बंधारा व्हावा
देवबाग गावात एका बाजूने समुद्र व दुसऱ्या बाजूने खाडी अशी स्थिती आहे. पावसाळ्यात येथील किनारपट्टी लगत असणारे ग्रामस्थ काहीसे भीतीच्या छायेत असतात. त्यामुळे शासनाने गावाची भौगोलिक स्थिती व पर्यटन वाढीचा विचार करून गावास समुद्र व खाडी मार्गावर बंधारा उभारावा अशी मागणी देवबाग सरपंच जानव्ही खोबरेकर यांनी केली आहे.



























































