महिनाभरापासून गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शोधमोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळेच्या हजेरी पटावरून एक महिन्यापेक्षा जास्त काळ गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभाग शोधमोहीम राबविणार आहे. या शोध मोहिमेच्या निमित्ताने शिक्षकांना आणखी एका अशैक्षणिक कामाला जुंपण्यात आले असून रात्रशाळा आणि अतिरिक्त शिक्षकांना 16 ते 21 डिसेंबरदरम्यान शाळाबाह्य मुलांचा शोध घ्यायचा आहे. या कामासाठी आठवडाभर हे शिक्षक शाळेबाहेर राहणार आहेत.

मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यातील कलम 4 नुसार 6 ते 14 वयोगटातील जी बालके नियमित शाळेत येत नाही. अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना वयानुसार वर्गांमध्ये प्रवेश देणे तसेच गरजेनुसार विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात बालरक्षक चळवळीच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला जात असून मुंबई शहरात यंदाच्यावर्षी 509 मुलांना शिक्षण प्रवाहात आणले आहे, असे मुंबई उत्तर विभाग शिक्षण निरीक्षक कार्यालयाने स्पष्ट केले.

प्रयत्न चांगला; पण शिक्षकच शाळाबाह्य होतोय

शाळाबाह्य मुलांना शाळेत परत आणण्यासाठी शिक्षण विभागाने सुरू केलेले प्रयत्न चांगले आहेत. पण अशा अशैक्षणिक कामांच्या बोजामुळे शिक्षकच शाळाबाह्य होत चालले असून त्यांना त्यांच्या वर्गावर लक्ष देणे अवघड जाते, अशी टीका शिक्षक वर्तुळातून सुरू आहे.

रात्रशाळा शिक्षकांवर जबाबदारी

शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या दुसर्या सत्रात मुंबई शहरातील सर्व शाळांच्या हजेरीपटावर एक महिन्यापेक्षा जास्त दिवस सतत गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी रात्रशाळा शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. ही माहिती 12 डिसेंबरपर्यंत गोळा करून रात्रशाळा आणि अतिरिक्त शिक्षकांनी बालरक्षक तसेच एनएसएसच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने 16 ते 21 डिसेंबरपर्यंत शाळाबाह्य मुलांचा शोध घ्यायचा आहे.