
पोलिसांनी जप्त केलेला तसेच बेवारस मिळून आलेला मुद्देमाल गहाळ होणे ही चांगली बाब नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी जप्त मुद्देमाल गहाळ होऊ नये यासाठी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मुद्देमालाची तपासणी करून त्याचा रेकॉर्ड करून ठेवावा, असे आदेश जारी केले आहेत.
काही दिवसांपूर्वी वाकोला पोलिसांनी एका गुह्यात जप्त केलेला किमती मुद्देमाल गहाळ झाल्याचा प्रकार घडला होता. याची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकारे जर पोलीस ठाण्यातील जप्त मुद्देमाल गहाळ होत असेल तर जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे असे प्रकार पुन्हा घडू नयेत याकरिता आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाने (प्रशासन) दर महिन्याला मुद्देमाल रजिस्टर बनवून मुद्देमाल तपासावा आणि तो योग्य असल्याची खात्री करावी, तर वरिष्ठ निरीक्षकाने महिन्यातून एकदा जप्त मुद्देमाल व्यवस्थित असल्याची खातरजमा करून घ्यावी. शिवाय विभागीय सहायक आयुक्तांनी तीन महिन्यांतून एकदा जप्त मुद्देमालाबाबत खातरजमा करायची असून परिमंडळीय उपायुक्तांनी सहा महिन्यांतून एकदा सदरची कारवाई करायची आहे, असे आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे.
पोलीस ठाण्यात जप्त असलेल्या मुद्देमालाचे प्रमाण जास्त आहे व सदर मुद्देमाल वर्षानुवर्षे पोलीस ठाण्यात पडून आहे. यात जप्त केलेला तसेच बेवारस मिळून आलेला मुद्देमाल असतो. या मुद्देमालाकडे दुर्लक्ष झाल्यास तो गहाळ होण्याची शक्यता जास्त असते आणि तसे झाल्यास जनमानसात पोलिसांप्रति चुकीचा संदेश जातो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.



























































