फोटोशूटसाठी पुस्तकांवर उभी राहिली अभिनेत्री, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेते किंवा अभिनेत्री यांचं फोटोशूट म्हटलं की तमाम चाहते उत्साहात असतात. फोटोशूटसाठी वापरण्यात येणाऱ्या भन्नाट थीम्स, कलाकाराचा लूक, त्याचे कपडे, मेकअप, दागिने इत्यादींना फॉलो करण्यासाठी ही फोटोशूट्स कधी येताहेत अशी चाहते वाट पाहत असतात. दरवेळी काहीतरी नवीन देण्याच्या नादात भलतीच चूक होण्याचीही शक्यता असते. असाच प्रकार एका अभिनेत्रीसोबत झाला आहे.

हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सेलेना गोमेझ हिच्या एका फोटोशूटवरून सध्या चांगलाच गदारोळ माजला आहे. कारण, एका ब्रँडसाठी फोटोशूट करत असताना सेलेना चक्क पुस्तकांवर उभी राहिली आहे. पुमा स्पोर्टच्या कपड्यांच्या कलेक्शनसाठी हे फोटोशूट करण्यात आलं होतं. सेलेना या फोटोशूटमध्ये पुस्तकांनी भरलेल्या एका खोलीत उभी असल्याचं या फोटोत दिसत आहे. मात्र, तिच्या पायाखालीही पुस्तकं दाखवण्यात आली आहेत.

या फोटोमुळे सेलेनाचे हिंदुस्थानी चाहते मात्र चांगलेच भडकले आहेत. पुस्तक हे विद्येची देवता सरस्वती हिचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे विद्येच्या देवतेला असं पायाखाली ठेवून तिचा अवमान करणं चूक असल्याचं अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तिच्या या फोटोखाली अनेक चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे.