ठाण्यात सर्वाधिक नवीन घरे,घरांच्या विक्रीत 4 टक्क्यांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईसह देशातील आठ प्रमुख शहरांमधील ग्राहकांचा घर खरेदीकडे ओढा दिसत असून जानेवारी ते जून 2019 या सहा महिन्यांत गृह प्रकल्पांच्या विक्रीत 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. आठ शहरांमध्ये एकूण 41 टक्के नवे गृह प्रकल्प सादर झाले. यातील सर्वाधिक प्रकल्प हे ठाणे शहरात आहेत.

नाईट फ्रँक इंडियाने मंगळवारी ‘इंडिया रिअल इस्टेट’ हा जानेवारी ते जून 2019 या सहा महिन्यांतील देशातील प्रमुख आठ शहरांमधील निवासी आणि व्यावसायिक बाजारपेठेवर आधारित अहवाल सादर केला. 2018 च्या पहिल्या सहामाहीत मुंबईतील निवासी प्रकल्पांची संख्या 35 हजार 874 होती. यात यंदा वाढ होऊन हा आकडा 43 हजार 822 वर पोहोचला आहे. तसेच विक्री झालेल्या घरांची संख्याही 4 टक्क्यांनी वाढून 33 हजार 731 वर पोहोचला आहे. 2018 च्या सहामाहीत हा आकडा 32 हजार 412 इतका होता.

  • मुंबईत निवासी प्रकल्पांमध्ये 22 टक्क्यांनी भर पडली आहे.
  • बांधून पूर्ण झालेल्या, पण विक्री न झालेल्या प्रकल्पांचे प्रमाण 14 टक्के म्हणजेच 1 लाख 36 हजार 525 इतके आहे.
  • जीएसटीमधील गोंधळ आणि निवडणुकांमुळे आलेल्या अनिश्चिततेचा परिणाम घरांच्या विक्रीवर झाला.
  • जीएसटीमधील बदलामुळे ग्राहक घर खरेदीत निरुत्साही.
  • नो फ्लोअर राईज, नो स्टॅम्प डय़ुटी, मेंटनेन्स फ्री, मोफत क्लब हाऊस, भाडे योजना सवलती देऊनही अनेक प्रकल्प ग्राहकांविना पडून.
  • मध्य मुंबईत ऑफिसेस भाडय़ाने घेण्याच्या व्यवहारांत 6 टक्क्यांची वाढ; त्याखालोखाल बीकेसीमध्ये 5 टक्क्यांची वाढ.

विकासकांचा भर परवडणाऱ्या आणि छोटय़ा घरांवर

मुंबई आणि इतर शहरांतील विकासकांचा भर हा परवडणाऱ्या आणि छोटय़ा घरांच्या निर्मितीवर आहे. नाईट फ्रँकचे कार्यकारी संचालक गुलाम झिया यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील 62 टक्के घरे ही 75 लाखांपेक्षा कमी किमतीची आहेत तर 82 टक्के घरांच्या किमती या 1 कोटीच्या आत आहेत.

निवासी घरांपेक्षा व्यावसायिक बाजारपेठेत तेजी

देशभरात निवासी घरांपेक्षा व्यावसायिक बाजारपेठेत म्हणजेच ऑफिस खरेदीत तेजी दिसून येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस ऍण्ड इश्युरन्स क्षेत्रातील तसेच इतर को-वर्किंग क्षेत्रातील संस्थांनी ऑफिससाठी जागा घेतल्याने मागील सहामाहीच्या तुलनेत यंदा व्यावसायिक क्षेत्रात 61 टक्के म्हणजेच 4.6 दशलक्ष चौरस फूट वाढ झाली आहे.