भीमा कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्र्यांना समन्स बजावा!

फाईल फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

भीमा कोरेगाव हिंसाचाराचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीची बुधवारी पहिली सुनावणी मंत्रालयासमोरील नव्या प्रशाकीय इमारतीत पार पडली. या सुनावणीच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी या भीमा कोरेगाव प्रकरणी सर्वप्रथम राज्याचे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावून समितीसमोर हजर करण्याची मागणी केली आहे.

भीमा कोरेगााव हिंसाचार प्रकरणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हिंदुत्त्वावादी नेते मिलिंद एकबोटे हे हिंसाचाराला जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्री हे जर गृहखात्याचा कारभार सांभाळत असतील तर त्यांनाही चौकशीसाठी इथे बोलवले पाहिजे. असे लाखे पाटील यांचे वकील बी.ए देसाई यांनी या सुनावणीच्या वेळी सांगितले. यावेळी तपास समितीने देसाई यांना मुख्यमंत्र्यांविरोधात पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुरावे सादर केल्यानंतरच समिती मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी बोलविण्याबाबत विचार करेल असे यावेळी सांगण्यात आले.

हिंसाचारासाठी दलित व माओवादी जबाबदार, एकबोटेंच्या वकिलाचा दावा
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले मिलिंद एकबोटे यांचे वकील नितीन प्रधान यांनी या हिंसाचारासाठी तसेच मराठा तरुणाच्या हत्येसाठी माओवादी व दलित संघटना जबाबदार असल्याचा दावा केला आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य साक्षिदार मनिषा खोतकर यांनी त्याचा हा दावा फेटाळून लावत दलित हे त्यांच्या स्वत:च्या लोकांवर हल्ला करुच शकणार नाहीत असा प्रतिवाद केला. यावेळी प्रधान आणि खोतकर यांच्यात शाब्दिक चकमक देखील जाली. ‘जर भगवे झेंडे घेऊन जाणाऱ्या लोकांवर तुम्ही दगडफेक करत असल्याचा आरोप करत असाल तर तो त्या व्यक्तींवर अन्याय होईल, असे प्रधान यांनी सांगितले. यावेळी खोतकर यांनी मग ‘निळ्या झेंडे असलेल्यांवर जो अन्याय झाला त्याचे काय? असा सवाल केला.

मनिषा खोतकर यांचे दावे चुकीचे, विवेक विचार मंचचा आरोप
विवेक विचार मंच यांनी देखील त्यांचा या प्रकरणातील अहवाल समितीसमोर सादर केला आहे. यावेळी मंचाचे वकील विजय सावंत यांनी मनिषा खोतकर यांचे दावे चुकीचे आणि अतिशयोक्ती असल्याचे म्हटले आहे. त्यावर मनिषा खोतकर त्यांच्यावर भडकल्या. ‘जर आमच्या जागी तुम्ही असता तर तुम्हाला आमची परिस्थिती समजली असती. मी माझी सर्व कामं बाजूला ठेवून न्यायासाठी इथे आलेय. टाईम पास करायला नाही, अशा शब्दात खोतकर यांनी त्यांचा राग व्यक्त केला.