
जुन्या पिढीतील प्रख्यात कबड्डीपटू रोहिदास हरिश्चंद्र ऊर्फ भाई पाथरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 82 वर्षे होते. त्यांच्या पश्चात 3 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.
भाई पाथरे यांचे सामाजिक व क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान होते. कबड्डीला प्रसिद्धी व लोकाश्रय मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. गिरगाव पुंभारवाडा येथील दुर्गादेवी कला-क्रीडा संघटनेचे सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्षे धुरा सांभाळली. 1980 च्या दशकात या संघटनेतर्फे त्यांनी महिला कबड्डी संघाची बांधणी केली. सर्वसाधारण कुटुंबातील मुलींचे एकत्रीकरण करून त्यांना कबड्डी खेळाडू म्हणून नावारूपाला आणले. मुंबईतील अनेक क्रीडा संघटनांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बीएआरसीमध्ये नोकरी करताना त्यांनी या संस्थेतही कबड्डीची पाळेमुळे रुजवली. क्रीडा क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल भाई पाथरे यांना प्रगती सांस्कृतिक प्रतिष्ठान, दीनदयाळ उपाध्याय जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.




























































