रुपयाच्या नीचांकाने शेअर बाजार गडगडला

सामना ऑनलाईन, मुंबई

डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठलेला  नवा नीचांक, देशाच्या चालू खात्यावरील वाढलेली तूट यामुळे शेअर बाजारात आज मोठी पडझड दिसून आली. सोमवारी रुपया 94 पैशांनी घसरून 72.67 प्रति डॉलर इतका झाला. याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आहे. बीएसई निर्देशांक 468 अंकांनी घसरून 37,922 तर निफ्टी 151 अंकांनी घसरून 11,500 वर स्थिरावला. 6 मार्चनंतर मुंबई शेअरबाजारात झालेली ही मोठी घसरण आहे.

2018 सालात आतापर्यंत रुपयाचे 13 टक्के अवमूल्यन झाले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 72.67 ची पातळी गाठली. अमेरिका आणि चीन दरम्यान वाढता व्यापारी तणाव, कच्च्या तेलाच्या जागतिक किमतीतील वाढ यामुळे विदेशी मुद्रा विनिमय बाजारात निर्माण झालेली स्थिती रुपयाची घसरण होण्यास कारणीभूत आहे.