सेन्सेक्सची विक्रमी झेप; सोने झाले स्वस्त

मंगळवारी 62 हजारांचा टप्पा पार केल्यानंतर मुंबई शेअर बाजाराने आज 63 हजारांचा टप्पा पार करत नवी विक्रमी कामगिरी केली. सेन्सेक्स प्रथमच 63 हजारांचा आकडा पार करत 63 हजार 303 वर पोहोचला. मात्र बाजार बंद होताना त्यात 417 अंकांची वाढ होत सेन्सेक्स 63 हजार 100 अंकांवर बंद झाला. निफ्टी 140 अंकांच्या वाढीसह 18 हजार 758 अंकांवर बंद झाला. सरकारी बँकेचा निर्देशांक वगळता सर्वच क्षेत्रातील समभागांमध्ये तेजी दिसली. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, धातू, रिअल इस्टेट, ऊर्जा आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. रुपयामध्येही आज 30 पैशांची तेजी होती आणि रुपया 81.42 च्या पातळीवर बंद झाला. दरम्यान, ऑगस्ट 2020 मध्ये 56 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठणाऱया सोन्यात मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबईत 22 कॅरेट सोने 48 हजार 550 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 52 हजार 970 पोहोचली आहे. जागतिक मंदीच्या वातावरणामुळे सोन्यात घसरण झाल्याचे म्हटले जात आहे. या आधी ऑक्टोबर महिन्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती.