
युरोपियन देश सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथील एका शाळेत गोळीबार झाला आहे. या गोळीबारात अनेक आठ विद्यार्थ्यांसह एका सुरक्षारक्षकाला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. याचबरोबर अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सर्बियाच्या गृह मंत्रालयाने या घटनेची माहिती दिली. गोळीबाराची घटना कळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात सहा विद्यार्थ्यांसह एक शिक्षक जखमी झाले आहेत आणि त्यांना उपचारासाठी नेण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार, गोळीबार आज सकाळी बेलग्रेडमधील व्लादिस्लाव रिबनीकर शाळेत झाला. जिथे अनेक विद्यार्थ्यांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी संशयित 14 वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याने त्याच्या वडिलांची बंदूक वापरल्याचा आरोप आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
गृह मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, शाळेत गोळीबार झाल्याची घटना कळताच पोलिसांचे गस्ती पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरुन एका संशयित अल्पवयिन विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या वक्तव्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेला अल्पवयीन मुलगा सातवीत शिकत असून त्याने वडिलांच्या बंदूकीतून या गोळ्या झाडल्या आहेत. घटनेनंतर व्लादिस्लाव रिबनीकर शाळेभोवतीचा नाका पोलिसांनी सील केला आहे.
बेलग्रेड हे सर्बियाचे सर्वात मोठे शहर आहे. हे सावा आणि डॅन्यूब नद्यांच्या संगमावर आणि पॅनोनियन मैदान आणि बाल्कन द्वीपकल्प दरम्यान वसलेले आहे. येथे शहरी भागाची लोकसंख्या 12 लाख आहे, तर एकूण लोकसंख्या सुमारे 17 लाख आहे. हे सर्वात शांत आणि सुंदर शहरांपैकी एक आहे.


























































