
सामना प्रतिनिधी, परभणी
शहरातील दत्तधाम परिसरातील शांतीनिकेतन कॉलनीत गुरुवारी मध्यरात्री धाडसी दरोडा पडला असून, दरोडेखोरांच्या मारहाणीत सात जण जखमी झाले आहेत. सहा जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तर एका जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
येथील वसमत रोडवरील दत्तधाम परिसरात असलेल्या शांतीनिकेतन कॉलनीत वासुदेवराव चक्रवार यांचे निवासस्थान आहे. 29 मे रोजी घरातील सर्व सदस्य झोपलेले असताना 30 मे रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घराचा मुख्य दरवाजा तोडून चारोटे घरात घुसले. या चोरट्यांनी घरातील सदस्यांना लाकूड आणि रॉडने मारहाण केली. तसेच महिलांच्या कानातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. या मारहाणीत वासुदेव चक्रवार (55), सविता चक्रवार(50) प्रेमला मालेवार (60), चंद्रकला पद्मावार (80), ऋषी चक्रवार (35), अंकिता चक्रवार (28) हरीश चक्रवार (26)असे सात जण जखमी झाले आहेत. किरकोळ जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. हरीष चक्रवार हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय परदेशी, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तटआदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच श्वानपथक ठसे तज्ञही घटनास्थळी दाखल झाले होते. दरोडेखोरांनी रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झाला नव्हता.





























































