
नवी दिल्ली: महान टेनिसपटू रोहन बोपन्ना, हॉकीतील दिग्गज गोलरक्षक पी. आर. श्रीजेश, स्टार टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल यांच्यासह हिंदुस्थानच्या सात खेळाडूंसाठी यंदाची हांगझोउ आशियाई क्रीडा स्पर्धा ही अखेरची स्पर्धा ठरणार आहे. कारण चाळीशी पार करणारे अन् चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेले हे खेळाडू पुढील चार वर्षांनंतर होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेपर्यंत निवृत्त होतील.
शरथ कमल : ४१ वर्षीय शरथ कमल या टेबल टेनिसमधील स्टार खेळाडूने आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत दोन वेळा पदक जिंकले आहे. यंदाची त्याची पाचवी व अखेरची आशियाई स्पर्धा होय. शरथ कमलने गतवर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकली होती. मागील आशियाई स्पर्धेतही त्याने मनिका बत्राच्या साथीत कांस्यपदक जिंकले होते. मात्र, यावेळी मनिका जी साथियानच्या साथीने आशियाई स्पर्धेत खेळणार आहे.
रोहन बोपन्ना व अचंता शरथ कमल हे वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडत आहेत. ३५ वर्षीय श्रीजेश आजही हिंदुस्थानी हॉकीची मुख्य भिंत म्हणून डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे. याचबरोबर अनुभवी कुस्तीपटू बजरंग पुनिया, स्टार स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल, टेनिसपटू अंकिता रैना व थाळीफेकपटू सीमा पुनिया कारकिर्दीतील अखेरची आशियाई स्पर्धा खेळणार आहेत. मात्र, यातील किती खेळाडू अखेरच्या पदकावर आपले नाव कोरणार याकडे हिंदुस्थानी क्रीडाप्रेमींच्या नजरा असतील.
रोहन बोपन्ना : ४३ वर्षीय रोहन बोपन्नाने या वर्षी पुरुष दुहेरीत विम्बल्डन उपांत्य फेरी आणि अमेरिका ओपनची फायनल खेळली होती. दोन दिवसांपूर्वी डेविस चषक स्पर्धेतील अखेरचा सामना खेळून बोपन्ना आता अखेरची आशियाई क्रीडा स्पर्धा गाजविण्यासाठी सज्ज झाला आहे. २१ वर्षांपूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पण करणारा बोपन्ना विजेतेपद राखण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे
पी.आर श्रीजेश : हिंदुस्थानी हॉकी संघाचा यशस्वी गोलरक्षक असलेला पी. आर. श्रीजेश हा एका वेळी एकाच स्पर्धेवर लक्ष केंद्रित करत असतो. कारकिर्दीतील अखेरच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आगामी वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट बुक करणे यावर सध्या त्याने लक्ष केंद्रित केले आहे. २००६मध्ये वरिष्ठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण करणारा श्रीजेश हा टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या हिंदुस्थानी संघाचा सदस्य होता. जकार्तामधील आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या हिंदुस्थानी संघाला यंदाच्या स्पर्धेत पदकाचा रंग बदलायचा असेल तर श्रीजेशला गोलपोष्टपुढे अभेद्य कामगिरी करावी लागणार आहे.
अंकीता जैन – सानिया मिर्झानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारी हिंदुस्थानची दुसरीच महिला टेनिसपटू ठरलेल्या अंकिता रैनाला यावेळीही पदकाचे दावेदार मानले जात आहे. या स्पर्धेत ती महिला दुहेरी व मिश्र दुहेरीत खेळू शकते.
शरथ कमल : ४१ वर्षीय शरथ कमल
या टेबल टेनिसमधील स्टार खेळाडूने आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत दोन वेळा पदक जिंकले आहे. यंदाची त्याची पाचवी व अखेरची आशियाई स्पर्धा होय. शरथ कमलने गतवर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकली होती. मागील आशियाई स्पर्धेतही त्याने मनिका बत्राच्या साथीत कांस्यपदक जिंकले होते. मात्र, यावेळी मनिका जी साथियानच्या साथीने आशियाई स्पर्धेत खेळणार आहे.
सीमा पुनिया – ४० वर्षीय सीमा पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील मागील दोन पर्वांत अनुक्रमे सुवर्ण व कांस्यपदक जिंकलेले आहे. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत तिला पदकाने हुलकावणी दिली होती. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पोडियमवर उभे राहण्यासाठी सीमा पुनिया थाळी फेकताना जीवाचे रान करणार, एवढे नक्की.
दीपिका पल्लीकल : दोन मुलांची आई असलेल्या दीपिका पल्लीकलची कारकिर्दीतील चौथी आशियाई क्रीडा स्पर्धा होय. या स्पर्धेत तिने आतापर्यंत एकेरीमध्ये दोन, तर सांघिकमध्ये दोन अशी चार पदके जिंकलेली आहेत. यंदाच्या आशियाई स्पर्धेत दीपिका ही हरिंदर पाल संधूच्या साथीत मिश्र दुहेरीत खेळणार आहे. दीपिकाने दोन मुलांची आई झाल्यानंतर ज्योत्स्ना चिनप्पा व सौरव घोषाल यांच्या साथीत दोन जागतिक किताब जिंकले होते. राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकलेले आहे.
बजरंग पुनिया : राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणप्रकरणी शङ्क ठोकणारा बजरंग पुनिया त्यानंतर प्रथमच स्पर्धेत उतरत आहे. २९ वर्षीय बजरंग हा आशियाई स्पर्धेतील ६५ किलो गटातील गतविजेता खेळाडू होय. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या बजरंगची कारकिर्दीतील ही तिसरी आशियाई स्पर्धा होय. या स्पर्धेत २०१४मध्ये त्याने रौप्यपदकाची कमाई केली होती.



























































