
बिहारमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सहरसामध्ये निकाह समारंभात मटण विरुद्ध चिकन वाद उफाळून आला. वर आणि वधू पक्षात तुफान हाणामारी झाली. यात 7 जण जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, महिशी ब्लॉकमधील राजनपूर गावात ही घटना घडली. सिमरी बख्तियारपूर नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या बालुआपार येथील रहिवासी मोहम्मद अन्वर यांचा मुलगा मोहम्मद अब्दुल्ला (उर्फ चांद) याचा विवाह राजनपूर गावातील मोहम्मद जावेद (उर्फ मोटो) यांच्या मुलीशी झाला होता.
गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास विवाह सोहळा शांततेत पार पडला आणि त्यानंतर पाहुण्यांना जेवण वाढण्यात आले. मात्र वर पक्षाच्या सदस्यांनी जेवणावर आक्षेप घेतला. त्यांना मटण देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्याऐवजी चिकन वाढण्यात आले असे वर पक्षाचे म्हणणे होते. यावरून दोन्ही पक्षात शाब्दिक वाद झाला. हळूहळू वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारामारी झाली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यात वर पक्षाकडील सातहून अधिक जण जखमी झाले.
जखमींना उपचारासाठी सिमरी बख्तियारपूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. घटनाक्रम समजून घेण्यासाठी तपास अधिकारी दोन्ही बाजूंच्या लोकांचे जबाब नोंदवत आहेत. या घटनेनंतर सहरसा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.





























































