मी वेगळी : ज्ञानदानाचा छंद

>> शैला चोगले, दहिसर (पश्चिम)  

माझ्या भावाचे अपघाती निधन झाले. त्यामुळे माझे मानसिक संतुलन काहीसे बिघडले. कुठल्याही कामात मन रमत नसे. सतत नकारात्मक विचार मनात येत असत. हे असे किती दिवस चालणार? मग एके दिवशी मी विचार केला आपण स्वतःला कुठल्यातरी कामात गुंतवून ठेवले पाहिजे. आपल्या ज्ञानाचा चांगला उपयोग केला पाहिजे. आपण आपल्या ज्ञानाचा काहीच वापर केला नाही तर त्यावर ‘गंज’ चढेल आणि मग मी घरी मुलांना शिकवायला सुरुवात केली. त्याआधीही मी मुलांना शिकवत होते. माझ्याकडे मारवाडी, पंजाबी, केरळा, बंगाली, यू.पी., बिहारी मुले त्याचप्रमाणे ख्रिश्चन, मुस्लिम धर्माची मुलेदेखील येत होती. मुलांचे पुस्तकी ज्ञान चांगले असावे, त्यांचे हस्ताक्षर चांगले असावे, त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी त्याचप्रमाणे त्यांच्यावर चांगले ‘संस्कार’ व्हावेत याकडे माझा कटाक्ष असे. माझा मुलांच्यात जीव रमू लागला. नंतर रविवार जवळ आला की मला फार कंटाळवाणे वाटू लागले. रविवारी मुले आज येणार नाहीत ही चिंता सतावू लागली.

हा ज्ञानदानाचा वारसा मला माझ्या वडिलांकडून मिळाला. ते जेव्हा वेळ मिळत असे तेव्हा आमचा अभ्यासच घेत असत. त्यावेळी त्यांच्याकडे शेजारील काही मुले गणिते सोडवण्यासाठी व इतर विषयांची प्रश्नोत्तरे शोधण्यासाठी येत असत. माझ्याकडे शिकून गेलेली मुले आता मोठी झाली आहेत; पण प्रत्येक ‘गुरुपौर्णिमा’ आणि ‘शिक्षकदिन’ या दिवशी ती आवर्जून भेटायला येतात. माझ्यासाठी गुलाबपुष्प आणि स्वतः तयार केलेले भेटकार्ड घेऊन येतात. मीदेखील ती भेटकार्ड जपून संग्रही ठेवते व त्यांच्या भावनांचा आदर करते.

मी जवळजवळ 40 वर्षे मुलांना शिकवले असे म्हणण्यापेक्षा मीच त्या मुलांकडून खूप काही शिकले. त्यांनी माझ्यात नवचैतन्य निर्माण केले असते म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

प्रत्येकीचं स्वतःचं वेगळेपण असतं. आपलं करीयर, छंद, घर, संसार, नवरा, मुलंबाळं… या सार्‍यांच्या पलीकडे… फक्त ते गवसणं आवश्यक असतं. अंतर्मुख होऊन थोडा स्वतःच शोध घेतला की ते वेगळेपण सापडतं. तुमच्यातील हे वेगळेपण शोधायला ‘श्रीमती’ही तुमच्या मदतीला आली आहे. चला तर मग… लेखणी उचला आणि तुमचे वेगळेपण फोटोसहित आम्हालाही कळवा. वेगळेपणास नावासहित प्रसिद्धी मिळेल.

आमचा पत्ता : श्रीमती, शेवटचे पान, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] या ईमेलवरही पाठवता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या